हरयाणाच्या चुका महाराष्ट्रात टाळा; काँग्रेस हायकमांडची राज्यातील नेत्यांना स्पष्ट सूचना

महाराष्ट्रातील भ्रष्ट असे महायुतीचे सरकार उलथून लावून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणणे हा काँग्रेसचा प्राधान्यक्रम आहे. मुख्यमंत्री कोण होणार किंवा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल, यापेक्षाही महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकदिलाने काम करा, हरयाणासारख्या महाराष्ट्रामध्ये चुका होऊ देऊ नका, महाराष्ट्रात हरयाणाची पुनरावृत्ती होता कामा नये, अशा कडक शब्दांमध्ये आज काँग्रेस हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना निवडणूक जिंकण्याचा कानमंत्र दिला.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या 15 जीआरजी या निवासस्थानी आज महाराष्ट्रातील नेत्यांची आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार वर्षा गायकवाड, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नेते उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल उत्सुकता आहे. मात्र हा विषय काँग्रेसच्या दृष्टीने तितकासा महत्त्वाचा नाही. महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा, अशा स्पष्ट शब्दांमध्ये सूचना देऊन काँग्रेस हायकमांडने राज्यातील काही अतिउत्साही नेत्यांना योग्य तो संदेश दिला आहे.

हरयाणामध्ये ज्याप्रमाणे जातीय ध्रुवीकरण झाले त्याप्रमाणे महाराष्ट्रात होता कामा नये. मराठा व ओबीसी वाद वाढल्यास त्याचा फटका पक्षाला बसेल. त्यामुळे राज्यात सामाजिक संतुलन व सौहार्द राखण्यासाठी विशेष प्रयत्न करा, अशी सूचनाही काँग्रेस नेतृत्वाने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना-राष्ट्रवादीशी समन्वय ठेवा

हरयाणा निवडणुकीत तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला तसा महाराष्ट्रामध्ये अजिबात होता कामा नये, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांशी योग्य समन्वय साधून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणा, अशा स्पष्ट शब्दांमध्ये काँग्रेस नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना दिल्या.