लार्सन ऍण्ड टुब्रोच्या कामगारांना घसघशीत पगारवाढ, भारतीय कामगार सेनेचा ऐतिहासिक करार

भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या पवई येथील कामगारांना तब्बल 16 हजार ते 22 हजार 800 रुपयांची घसघशीत पगारवाढ झाली आहे. त्याचप्रमाणे सध्या अस्तित्वात असलेल्या सुविधा कामगारांना यापुढेदेखील मिळणार आहेत. याबद्दल कामगारांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.

गेली 62 वर्षे लार्सन टुब्रो या कंपनीमध्ये भारतीय कामगार सेना मान्यताप्राप्त युनियन आहे. भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे तसेच लार्सन टुब्रो कंपनीचे संचालक अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली लार्सन अँड टुब्रो मुंबई येथील कंपनीमध्ये हा करार 8 ऑक्टोबरला पार पडला. त्यानुसार पवई येथील कामगारांना सरासरी 16 हजार रुपयांची पगारवाढ झाली आहे. या करारामुळे कामगारांना जास्तीत जास्त 22,800 रुपयांची प्रति महिना वाढ मिळेल. याव्यतिरिक्त एमआरयू भत्त्यामध्ये 2600 रुपयांची प्रति महिना अधिक वाढ मिळेल.

पगारवाढीच्या करारावर भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस सुधा आंगणे, चिटणीस संदीप राऊत यांनी तसेच व्यवस्थापनाच्या वतीने जीएम आय आर हेड सुहास घटवाई, व्हीपी एचआर हेड मनीष गौर, जेजीएम प्रोडक्शन हेड अजित पंडितराव, युनिट कमिटीतर्फे अध्यक्ष यशवंत सावंत, कार्याध्यक्ष अमोल शिळीमकर, सरचिटणीस विनायक नलावडे, उपाध्यक्ष कृष्णकांत कदम, खजिनदार प्रवीण मोरे, व्यवस्थापकीय समितीतर्फे सीनि. डीजीएम हरीश महाडिक, रंडल न्यून्स, डीजीएम प्रशांत पाटील, डीजीएम मनीष पालकर, एजीएम रश्मी घरत, असिस्टंट लेबर कमिशनर मनीषा कदम यांनी स्वाक्षऱ्या केल्या.