पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सांस्कृतिक सभागृहाला झुडपांचा विळखा, परभणी जिल्ह्यातील कळगाव ग्रामस्थांची तक्रार

<<<सुरेश जंपनगिरे>>>

पूर्णा तालुक्यातील कळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाला काटेरी झुडपांचा विळखा पडला आहे. सभागृहाचे बांधकाम अतिशय निकृष्ट असल्यामुळे भिंतींना तडे गेले आहेत. बांधकाम अपूर्ण टाकून गुत्तेदार गायब झाला आहे. ग्रामपंचायतीने तक्रार करूनही अद्याप कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.

पूर्णा तालुक्यातील कळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहाच्या कामास 2019 मध्ये मंजुरी देण्यात आली. हे काम आर. जी. देशमुख या एजन्सीला देण्यात आले. गुत्तेदाराने सभागृहाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे केले. सभागृहाच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले असून अहिल्यादेवी होळकर यांचे छायाचित्रही व्यवस्थित लावण्यात आलेले नाही. सभागृहाच्या बांधकामात झालेल्या गैरव्यवहारामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतनेही निकृष्ट काम झाल्याचा अहवाल दिला असून ग्रामस्थांनीही यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

अनेक कामे अपूर्ण

सांस्कृतिक सभागृह बांधत असताना त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची सोय करण्यासाठी बोअरवेल घेणे आवश्यक आहे. परंतु गुत्तेदाराने बोअरवेल घेतला नाही. सभागृहाला येण्यासाठी रस्ताच नाही. सभागृहाभोवती काटेरी झुडपांचा विळखा पडला आहे. विद्युतीकरणाचे कामही अपूर्ण आहे. स्वच्छतागृह नाही. सर्व कामे अपूर्ण सोडून गुत्तेदार गायब झाला आहे.

ग्रामपंचायतीचा अहवाल नकारार्थी

अंदाजपत्रकाप्रमाणे कामे अपूर्ण असल्याबाबतचा अहवाल ग्रामपंचायत कार्यालय कळगाव यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पूर्णा यांना सादर केलेला आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग हे भ्रष्ट गुत्तेदारांचे माहेरघर असल्याने या प्रकरणी कोणतीही चौकशी अथवा कारवाई झालेली नाही.