सिद्दिकी यांच्या हत्येचा कट पुण्यात शिजला, गुजरातच्या साबरमती जेलमधून बिष्णोईने सूत्रे हलवली

अजित पवार गटाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा कट पुण्यात शिजल्याची माहिती प्राथमिक तपासात उघडकीस आली आहे. हत्येप्रकरणी बिष्णोई टोळीने जबाबदारी स्वीकारली असून, अटकेतील तीन आरोपींसह पसार आणखी तिघांनी प्लॅनिंग करीत हत्या केली. दरम्यान, लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातच्या साबरमती कारागृहात आहे. तिथून त्याने सूत्रे हलवल्याचेही सांगण्यात येत आहे. धर्मराज कश्यप, गुरुनील सिंह, प्रवीण लोणकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोहम्मद जिशान अख्तर, शिवकुमार गौतम, शुभम लोणकर अशी फरार असलेल्या आरोपींची नावे आहेत.

सिद्दिकी हत्याप्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने अटक केलेला प्रवीण लोणकर मागील दोन वर्षांपासून कर्वेनगरमधील भालेकरवस्तीवर दूध डेअरी चालवीत होता. त्याचा भाऊ शुभम आणि प्रवीण हे दोघेही सोशल मीडियाद्वारे लॉरेन्स बिष्णोई टोळीशी जोडले गेले. बिष्णोई टोळीला हत्यारे पुरविल्याबद्दल शुभम लोणकर याला फेब्रुवारी 2024 मध्ये अटक केली होती. त्यानंतर त्याची न्यायालयाने सुटका केली होती. दरम्यान, शुभम लोणकर अकोल्यातील अकोट या मूळ गावी राहत होता, तर प्रवीण लोणकर हा भालेकरवस्तीवर लोणकर डेअरीतून दुग्धजन्य पदार्थांची विक्री करीत होता. दरम्यान, बाबा सिद्दिकी हत्याकांडातील अटक आरोपी धर्मराज कश्यप हा दोन वर्षांपूर्वी परराज्यातून पुण्यात आला होता, तर गुरुनील सिंह हा सहा महिन्यांपूर्वी पुण्यात आला होता. प्रवीणने दोघांनाही ‘श्री बालाजी व्रॅप सेंटर’ या भंगार विक्रेत्याकडे काम मिळवून दिले होते. दोन्ही आरोपींना आसरा आणि काम मिळवून दिल्यामुळे त्यांच्यात सलोखा वाढला. त्यानंतर आरोपींची पुण्या-मुंबईत ये-जा सुरू होती. प्लॅनिंगनुसार काही महिन्यांपूर्वी दोन्ही आरोपींनी कुर्ल्यात मुक्काम हलविला होता.

हत्याकांड प्रकरणातील तीन आरोपी आमच्या कोठडीत असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी बिष्णोई गँगचे नाव समोर येत असून, त्याचा सखोल तपास करीत आहोत. सहाजणांव्यतिरिक्त आणखी आरोपींना अटक होऊ शकते. – दत्ता नलावडे (उपायुक्त, गुन्हे शाखा, मुंबई)

 सिद्धू मुसेवाला हत्याकांडातही होते पुणे कनेक्शन

 पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या लॉरेन्स बिष्णोई गँगने केली होती. संबंधित प्रकरणात पोलिसांनी पुणे जिह्यातील आंबेगाव तालुक्यातील संतोष जाधव, जुन्नर तालुक्यातील नवनाथ सूर्यवंशी, सिद्धेश कांबळे यांना अटक केली. हे तिघेही सोशल मीडियातील पोस्टमुळे प्रभावित होऊन बिष्णोई गँगशी जोडले गेले होते. गुजरातमध्ये तुरुंगात असलेला लॉरेन्स बिष्णोई, तसेच परदेशात असलेले त्याचे साथीदार अनमोल बिष्णोई आणि गोल्डी ब्रार हे सोशल मीडियाद्वारे तरुणांची माथी भडकावून त्यांना गँगमध्ये सहभागी करून घेतात. देशाच्या विविध राज्यांत या गँगने नेटवर्क उभे केले असून, त्यांच्याकडून सिनेअभिनेते, राजकारण्यांना धमकाविले जात आहे.

मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून पकडलेल्या प्रवीण लोणकर याला आज न्यायालयाने 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.  प्रवीणचा या गुह्यात सक्रिय सहभाग असल्याने त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती.

काम मिळवून देण्याच्या आमिषाने आरोपी प्रवीण आणि शुभम लोणकर यांनी बाबा सिद्दिकी हत्याकांडातील शूटर्सना एकत्रित केले. त्यानंतर  सिद्दिकी यांची हत्या करण्याचे काम सोपविले होते.

आरोपींना देण्यासाठी लोणकर भावांकडे पैसा कुठून व कोणाकडून आला, आरोपींना शस्र मुंबईत कोणी व कसे पाठवले याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.

प्रवीणने हल्लेखोरांना दिले प्रत्येकी 50 हजार रुपये

हत्या करण्यासाठी प्रवीणने प्रत्येक आरोपीला 50 हजार रुपये दिले होते. तसेच त्यांची राहण्याची व जेवणाची सोयही केली होती. आरोपींकडे सिद्दीकी यांचा पह्टो देऊन, ‘आपल्याला यालाच मारायचे आहे,’ असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी रेकी करीत हत्या करण्याचा दिवस निवडला. त्यासाठी पिस्तुलातून गोळी कोणी मारायची, जखमी आरोपीच्या डोळ्यांत मिरची प्रे कसा मारायचा, याचीही तयारी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

बाबा सिद्दिकी हेच टार्गेटवर

बाबा सिद्दिकी हेच आरोपींच्या टार्गेटवर होते. त्यांनाच जीवे ठार मारायचा आरोपींचा कट होता. त्याकरिता बाबा सिद्दिकी यांचा एक पह्टो तसेच एक पह्टो असलेला फ्लेक्स आरोपींना पुरविण्यात आला होता. पद्धतशीर रेकी केल्यानंतर हल्ला करण्यात आला, असे आरोपींच्या चौकशीतून समोर येत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.