एसटीकडून हंगामी भाडेवाढ रद्द
एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता यंदा करण्यात आलेली हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जनतेची नाराजी निर्माण होऊ नये, म्हणून भाडेवाढ रद्द करण्यात आली, असे बोलले जात आहे. एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर अशी एका महिन्यासाठी हंगामी भाडे वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात परिपत्रक जारी केले होते. ही प्रस्तावित भाडेवाढ मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरी बस वगळता सर्व बसेससाठी लागू होती. यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार होती. हंगामी भाडेवाढीच्या महिनाभरात एसटी महामंडळाला 1000 कोटींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती.
विमानात बॉम्बची अफवा
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून न्यूयॉर्कला जाणाऱ्या तीन विमानांत बॉम्ब ठेवल्याचा फोन नवी मुंबई पोलिसांच्या हेल्पलाईनवर आला. त्या विमानाची तपासणी केल्यानंतर ती विमाने न्यूयॉर्कला रवाना करण्यात आली. तर एअर इंडियाच्या विमानाला दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवून सर्व प्रवाशांची तपासणी केली. सोमवारी पहाटे नवी मुंबई पोलिसांच्या 112 या ट्विटरवर मेसेज आला होता.
बीकेसीतील आणखी तीन भूखंडांचा लिलाव
एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुल सात भूखंडांच्या ई लिलावासाठी ऑगस्टमध्ये निविदा काढल्या होत्या. त्या पाठोपाठ आणखी तीन व्यावसायिक वापरासाठीच्या भूखंडांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची ई लिलावासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून या भूखंड लिलावातून एमएमआरडीएला किमान 656 कोटी रुपये इतका महसूल मिळण्याची शक्यता आहे.
क्षयरोग रुग्णांसाठी आयआरसीयू विभाग
क्षयरोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आयआयसीयू जागा मिळविण्यासाठी मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये संघर्ष करावा लागतो. रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात श्वसनाचा तीव्र त्रास असलेल्या रुग्णांसाठी 10 खाटांचा आयआरसीयू विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन वैद्यकीय अतिदक्षता तज्ञ आणि चार वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सहा डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
माजी आमदाराच्या मुलाची आत्महत्या
माजी आमदाराच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. माजी आमदार हे कांदिवली येथे लोखंडवाला येथे राहतात. त्याचा मुलगा हा मनोरंजन क्षेत्रात होता. सोमवारी तो घरी होता. बराच वेळ झाल्यानंतर तो रूममधून बाहेर आला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. त्याला उपचारासाठी भगवती रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती समजताच समतानगर पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.