Icc Women’s T20 World Cup 2024 मध्ये सोमवारी (14-10-2024) झालेल्या पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड या साखळी फेरीतील सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 54 धावांनी पराभव केला. या विजयासोबत न्यूझीलंडने सेमी फायनलचे तिकीट पक्के केले आहे. मात्र पाकिस्तानच्या पराभवामुळे पाकिस्तानसह टीम इंडिया टी20 विश्वचषकातून बाहेर फेकली गेली आहे.
टीम इंडियावर 2016 नंतर 8 वर्षांनी पहिल्यांदाच साखळी फेरीत बाद होण्याची नामुष्की ओढावली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात उतरलेली टीम इंडिया साखळी फेरीत 4 सामन्यांपैकी 2 सामने जिंकली, तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. महिला टी-20 विश्वचषकामध्ये ग्रुप ‘अ’ मधून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दोन संघ सेमी फायनलसाठी पात्र झाले आहेत. मात्र ग्रुप ‘बी’ मधून सेमी फायनलसाठीचे समीकरण अजूनही स्पष्ट झालेले नाही. इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका हे संघ सेमी फायलनच्या शर्यतीमध्ये आहेत.
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 110 धावा केल्या होत्या. आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण संघ फक्त 56 धावा करून तंबूत परतला. न्युझीलंडच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाजांचा निभाव लागला नाही आणि 54 धावांनी न्यूझीलंडने सामना जिंकत सेमी फायलनचे तिकीट पक्के केले.