आपल्या सुसंस्कृत मुंबईत हे काय चाललंय? दिंडोशी घटनेवरून आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल

मुंबईतील दिंडोशी येथे रिक्षा चालकाने मोटारसायकलला ओव्हर टेक करण्याच्या वादातून जमावाने बेदम मारहाण केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला असून त्यात त्या तरुणाचे आई वडील मुलाला मारू नये म्हणून जमावापुढे विनवण्या करत होते. आई तर थेट मुलाच्या अंगावर झोपली मात्र तरिही जमावाला कुणाचीच दया आली नाही त्यांनी तो तरुण मरेपर्यंत त्याला मारहाण केली. या प्रकरणी अविनाश कदमला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ”मुंबईत ‘रोड रेज’ मध्ये एका युवकाला गर्दीकडून अमानुषपणे मारलं जातं आणि त्यात त्या युवकाचा मृत्यू होतो, ही घटना भयंकर दुःखद आणि चीड आणणारी आहे. आपल्या सुसंस्कृत मुंबईत हे काय चाललंय?”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.