Ratnagiri News – मुकबधीर आणि कर्णबधीर लेकीची कला बापाने हेरली अन् ऋणालीने स्वत:ला सिद्ध करून दाखवले

जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांची सांगड घातली की अशक्यप्राय गोष्ट सुद्धा शक्य होते. यासाठी गरज असते ती योग्य संधीची आणि आपल्यात असणाऱ्या कलेला ओळखण्याची. या प्रवासात आई-वडिलांचा पाठिंबा किती महत्वाचा असतो याचं उदाहरण रत्नागिरीत पहायला मिळाले. पूर्णपणे कर्णबधीर आणि मुकबधीर असणाऱ्या लाडक्या लेकीची कला बापाने हेरली आणि ऋणाली बडद या तरुणीने स्वत:ला सिद्ध करून दाखवले.

रत्नागिरीची ऋणाली ही जन्मापासून कर्णबधीर आणि मुकबधीर आहे. तिचे दहावी पर्यंतचे शिक्षण रत्नागिरीमधील मुकबधीर विद्यालयातून झाले. त्याच दरम्यान तिला चित्रकलेची आवड असल्याचे तिच्या पालकांना जाणवले, तिची आवड आणि कलाक्षेत्राकडे असलेला कल लक्षात घेऊन तिच्या वडिलांनी ऋणालीला पुण्याच्या चित्रकलेचा फाऊंडेशन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिकायला पाठवलं. तो अभ्यासक्रम ऋणालीने यशस्वीरीत्या पूर्णही केला. त्यानंतर पुढे काय करायच? हा प्रश्न निर्माण झाला. ऋणाली संगणक चांगल्या पद्धतीने हाताळत होती. त्याचबरोबर चित्रकलेचा अभ्यासक्रम सुद्धा तिने यशस्विरीत्या पूर्ण केला होता. त्यामुळे तिने ग्राफिक ॲड ॲनिमेशनचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम करण्याचा निर्णय घेतला आणि कोल्हापूर येथे राहून तिने अभ्यास पूर्ण केला.

शिक्षण घेत असताना अनेक अडचणींचा ऋणालीला सामना करावा लागला. सर्वात मोठी अडचण म्हणजे ऐकू येत नसल्याने शिकवत असलेला अभ्यास आत्मसात करता येत नव्हता. शिक्षकांपुढे सुद्धा हे मोठं कोडं निर्माण झालं होतं. पण ऋणालीसारख्या जिद्दी आणि हुशार विद्यार्थीनीला शिकविण्याचे आव्हान शिक्षकांनीही स्विकारले. सुरुवातीला पाच सहा महिने अनेक अडचणी आल्या, पण हळूहळू सराव झाला आणि ऋणालीने तो अभ्यासक्रम प्रथम क्रमांकाने पूर्ण केला. ऋणाली सध्या रत्नागिरीमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून कामं करत आहे. तिने सुरुवातीला शिवम साळवी यांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली आणि आता ती स्वतः कामं करत आहे. रत्नागिरीमधील काही सोने व्यावसायिकांच्या दुकानाच्या जाहिराती तीने स्वतः तयार करून दिल्या आहेत. ऋणाली बडद अत्यंत हुशार असून तीला रांगोळी, मेहंदी तसेच केळीच्या सोपान पासून विविध चित्रे तयार करण्याची आवड आहे.