माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची वांद्रे इथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हत्येचे कारण सांगितले. दरम्यान, NIA ने लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोईने रडारवर असणाऱ्या 5 व्यक्तींची नावे सांगितली आहेत.यामध्ये पहिल्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान याचा समावेश आहे.
शनिवारी रात्री आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे-खेरनगर येथील कार्यालयातून घरी जात असताना दबा धरून बसलेल्या तिघांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला होता. यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न राज्यात निर्माण झाला आहे. बिश्नोई टोळीने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र बिश्नोई टोळीचा म्होरक्या सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. असे असले तरी त्याचे चेले त्याच्या इशाऱ्यावर गुन्हा करत आहेत. अशातच NIA ने लॉरेन्स बिश्नोईची चौकशी केली असता त्याचं पुढचं टार्गेट अभिनेता सलमान खान असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर अन्य चार जणांची नावे सुद्धा त्याने सांगितली आहेत.
आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर आहे. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याचा मॅनेजर सगुनप्रीत सिंग याचे नाव आहे. बिश्नोई गँगशी जवळचे संबंध असणाऱ्या विक्की मिद्धुखेडा याची 2021 साली हत्या करण्यात आली होती. मिद्धुखेडाची हत्या करणाऱ्यांना सगुनप्रीत सिंगने आश्रय दिला होता. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर गँगस्टर मंदीप धालीवाल, चौथ्या क्रमांकावर गँगस्टर कौशल चौधरी आणि पाचव्या क्रमांकावर बंबीहा टोळीचा म्होरक्या अमित डागर याचा समावेश आहे.