मुंबईहून न्यूयॉर्कला निघालेल्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्यानंतर आता मुंबई हावडा मेलला टाईम बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली आहे. सकाळी चारच्या सुमारास ऑफ कंट्रोलला हा मेसेज मिळाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली.
ट्रेनच्या अधिकाऱ्यांना मेसेज मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ ट्रेन नंबर 12809 ही मेल जळगाव स्टेशनवर थांबविली आणि तपास केला. तब्बल दोन तास तपास केला. त्यात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यानंतर मेल पुन्हा पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली. ही बॉम्बची धमकी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली होती.
उजलुद्दीन नावाच्या अकाऊंटच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली होती. यामध्ये लिहीले होते की, ‘हिंदुस्तान वालों… खून के आंसू रोओगे’ असे लिहीत आज विमानातही बॉम्ब ठेवण्यात आला आहे आणि 12809 ट्रेनमध्येही बॉम्ब ठेवण्यात आला आहे. रेल्वेत नाशिक येण्यापूर्वी मोठा धमाका होईल असा मेसेज लिहीण्यात आला होता.
आज सकाळी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर विमानाला तत्काळ दिल्लीच्या दिशेने वळविण्यात आले आणि दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले.