मेव्हणीच्या लग्नपत्रिकेत नाव नसल्याने संतापलेल्या जावयाच्या हत्येची सुपारी सासऱ्याने दिल्याची धक्कादायक घटना पुणे येथे घडली. या गुह्यात सासऱ्याला मदत करणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. परमेश्वर शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. 3 डिसेंबर 2016 रोजी शिंदेला अटक झाली. याआधीही 2017मध्ये शिंदेने जामिनासाठी अर्ज केला होता.
खटला नऊ महिन्यांत सुरू न झाल्यास पुन्हा जामिनासाठी याचिका करण्याची मुभा देत न्यायालयाने शिंदेचा अर्ज निकाली काढला होता. कोरोना काळात राज्य शासनाच्या धोरणानुसार अन्य कैद्यांसोबत त्यालाही जामीन मिळाला. जामिनाची मुदत संपली तरी खटला सुरू झाला नाही. त्यामुळे शिंदेने जामिनासाठी नव्याने याचिका केली.
न्या. अजय गडकरी यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या खटल्यात केवळ आरोप निश्चिती झाली आहे. त्यानंतर खटल्यात काहीच प्रगती झालेली नाही, असे सरकारी वकील अमित पालकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने शिंदेला 25 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
काय आहे प्रकरण
सागर कवितके यांची डिसेंबर 2016मध्ये हत्या झाली. त्यांची पत्नी मोनिका यांनी यांच्या तक्ररीनुसार सासरा भारत कोकरे, परमेश्वर शिंदे व अन्य आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. बहिणीच्या लग्नपत्रिकेत नाव न टाकल्याने सागर संतप्त झाला होता. सागर आणि माझे वडील भारत यांच्यात वाद झाला होता. त्याचा राग ठेवून भारत यांनी शिंदे व अन्य एकाला सागरची हत्या करण्यास सांगितले, असे मोनिका यांनी तक्रारीत नमूद केले. या तक्रारीच्या आधारावर शिंदेला अटक झाली.