विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिंधे-फडणवीसांमध्ये ‘गृह’कलह! ठाण्यातील मर्जीतल्या अधिकाऱ्यांना मुंबईत घुसवले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह खात्यात हस्तक्षेप वाढला असून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी पोस्टिंग देण्याचा सपाटा मिंधेंनी लावला आहे. त्यात सर्व नियम धाब्यावर बसवून मुंबईतील पॅडर पोस्टवर ठाण्यातून काही नॉन पॅडर अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गृह खात्यावर दबाव टाकून या बदल्या केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तसेच प्रशासकीय निकडीनुसार बदल्या करण्यात येत असल्याचे कारण देऊन उपायुक्त दर्जाच्या आठ अधिकाऱ्यांच्या बदल्या 11 ऑक्टोबर रोजी करण्यात आल्या. विशेष कृती दल, विशेष शाखा, संरक्षण, मुख्यालय अशा ठिकाणी नव्या अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली. गुन्हे शाखा, सुरक्षा, वाहतूक (पूर्व उपनगरे), परिमंडळ अशा ठिकाणी उपायुक्तपदावर प्राधान्याने आयपीएस अधिकाऱ्याला नियुक्ती दिली जाते. मात्र, यातील काही ठिकाणी नॉन कॅडर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत या बदल्या करण्यात आल्या आहेत. यातील तीन अधिकारी ठाण्यात सेवेत होते. तिथून त्यांना मुंबईत आणले गेले आहे. हे अधिकारी मिंधेंच्या मर्जीतील असल्याने राजकीय हेतूने त्यांना आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी मिंधेनी बसवल्याची चर्चा आहे.

कॅडर पोस्टवर नॉन कॅडर अधिकाऱ्याची नियुक्ती नियमाला धरून नाही. तरीही मिंध्यांच्या आदेशाने ठाण्यातील नॉन कॅडर अधिकाऱ्यांना मुंबईत आणले गेले आहे. यातील काही अधिकाऱ्यांचे ट्रक रेकॉर्ड वादग्रस्त असूनही मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा पदांवर त्यांना बसवण्यात आले आहे. ठाण्यातून मुंबईत क्रीम पोस्टिंग मिळालेले तीन अधिकारी तर ‘मोस्ट करप्ट’ म्हणून बदनाम आहेत. त्या तिघांवरही मिंध्यांनी वरदहस्त ठेवला आहे.

कर्तबगार आणि अनुभवी आयपीएस अधिकाऱ्यांना बाजूला सारून या नियुक्त्या देण्यात आल्याने पोलीस दलात खदखद असून या नियुक्त्यांना कोर्टात आव्हान देण्याची तयारी काही अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. मर्जीतल्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकीय गेम वाजवले जात आहेत. त्यासाठीच बदल्यांचा सपाटा लावला गेला आहे. गंभीर बाब म्हणजे यासाठी मिंधे देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या गृहखात्यात थेट हस्तक्षेप करत असल्याची चर्चा आहे.

मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात

मिंधेंचा गृहखात्यात हस्तक्षेप वाढला आहे. गुंड टोळीप्रमाणे पोलीस दल चालवले जात आहे. राजकीय स्वार्थासाठी त्यांना वापरले जात आहे. त्यातून अनुभव नसलेले अधिकारी संवेदनशील पदांवर बसल्याने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. आठ दिवसांत मुंबईत दोन राजकीय हत्या झाल्या. आधी अजित पवार गटाचा भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी याची हत्या झाली तर काँग्रेसमधून अजित दादा गटात गेलेले बाबा सिद्दिकी यांची काल वाय सुरक्षा भेदून हत्या करण्यात आली. मिंधे सरकारमध्ये सुरू असलेल्या ‘गृह’कलहाचाच हा परिणाम असल्याची चर्चा पोलीस दलात आहे.

अशा केल्या बदल्या

नवनाथ ढवळे (परिमंडळ-6), नितीन पवार (मुख्यालय-2), रागसुधा आर (परिमंडळ-4), मंगेश शिंदे (विशेष कृती दल- आर्थिक गुन्हे शाखा), पुरुषोत्तम कराड (विशेष शाखा-1), महेश चिमटे (संरक्षण), कृष्णकांत उपाध्याय (मुख्यालय-1), दत्तात्रय कांबळे (परिमंडळ- 3), विवेक पानसरे (गुन्हे शाखा- अंमलबजावणी), प्रदीप चव्हाण (वाहतूक – पूर्व उपनगरे), विजयकांत मंगेश सागर (परिमंडळ-7), डॉ. दीपाली धाटे (सुरक्षा), निमित गोयल (सशस्त्र पोलीस- कलिना), सुधाकर पठारे (बंदर परिमंडळ), सचिन गुंजाळ (परिमंडळ-10)