ज्येष्ठ नाट्यलेखक आनंद म्हसवेकर यांचे निधन

ज्येष्ठ नाट्यलेखक, दिग्दर्शक, कवी आनंद म्हसवेकर यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. म्हसवेकर यांच्या ‘मु. पो. वडाचे म्हसवे ते यू. एस. ए.’ या आत्मचरित्राचे प्रकाशन रविवारी दादर-माटुंगा कल्चर सेंटर येथे होते, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. म्हसवेकर यांच्या निधनाने नाट्य-साहित्य विश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

डोंबिवली येथील शिवमंदिर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. सातारा जिह्यातील म्हसवे हे आनंद म्हसवेकर यांचे मूळ गाव. शिक्षणानिमित्त ते मुंबईत आले आणि नंतर त्यांनी मराठी नाट्यसृष्टीत आपला ठसा उमटवला.

आनंद म्हसवेकर यांनी ‘यांचं हे असंच असतं’, ‘यू टर्न’, ‘सासू नंबर वन’, ‘अस्से नवरे अश्शा बायका’, ‘रेशीमगाठी’, ‘चॉईस इज युवर्स’, ‘बायको माझी लय भारी’ अशा अनेक लोकप्रिय नाटकांचे लेखन केले. त्यांच्या ‘शोध जो किनारा’, ‘कवचपुंडल’, ‘लागीर’, ‘पंडोलन्स’, ‘बेला के फूल’ आणि ‘विटलेले रंग’ या एकांकिकादेखील प्रसिद्ध आहेत. 25 व्यावसायिक नाटके आणि 14 चित्रपटांसाठी त्यांनी पटलेखन केले. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या म्हसवेकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.