विज्ञान-रंजन – जलद जलपर्णी

महिना-दीड महिन्यापूर्वी मुंबईजवळच्या उल्हासनदीच्या पुलावरून जाताना एका बाजूला नदीचे पात्र जलपर्णी वेलींनी पूर्णपणे भरलेले (किंवा ग्रासलेले) दिसले. पाण्यावर तरंगणारी ही जलद वाढीची वनस्पती बघता-बघता सारा जलाशय व्यापून टाकते. सहसा ओघवत्या प्रवाही जलस्रोतावर ती स्थिर राहात नाही. परंतु नदी पात्र जेथे संथ होते तिथे ही वनस्पती वेगाने विस्तारते.

पॉन्टेडेरिया व्रेसिप्स किंवा आइकोर्निया व्रेसिप्स अथवा वॉटर हायसिंथ म्हणजेच साध्या शब्दात जलपर्णीची वेल इतक्या वेगाने वाढते की अवघ्या 23 दिवसांत शेकडो पटीने तिचा विस्तार होतो. त्यामुळे महिनाभरापूर्वी सरोवरे तळी, नद्या यांच्या कोपऱ्यात किंवा काठालगत दिसलेल्या या वनस्पतीच्या पाऊण महिन्यातल्या वाढीने आपण चकित होतो.

मला अशा वनस्पतींच्या ‘जीवनेच्छे’चं काैतुक वाटतं. साधी हरळी किंवा दुर्वांची नाजूक वेल घ्या. कवी यशवंत (पेंढरकर) यांच्या शब्दात त्यांची ‘मुळी’ खोलवर रुजलेली असते. अगदी मुंबईच्या रेल्वे-ट्रकमधे खडी साफ करताना उपटून टाकलेली हरळीची हिरवीगार पाती, पावसाचा पहिला शिडकावा होताच हळूच डोपं वर काढतात आणि ‘आम्हा अवध्य आहोत’ असंच काहीसं अबोलपणे सांगतात. भूमीवर जशी हरळी तशीच पाण्यावर जलपर्णी.

या वेलीसारख्या वनस्पतीची गुंतागुंतीची मुळं चिवट असतात. त्यांना फुग्यांसारखे (नोड्युल्स) काही भाग असल्याने त्यामुळे ती वेल तरंगते. पाहताना तर पाण्यावरच्या हिरव्यापंच रांगोळीसारखी मनोहारी दिसते. मात्र या वॉटर-हायसिंथचे ‘प्रताप’ फारच मोठे आहेत. जलपृष्ठावर एक मीटरभर उंच जाणाऱ्या या वनस्पतीची पाने सुमारे 10 ते 20 सेंटीमीटरची असतात आणि अवघ्या 23 दिवसांत कैक पट वाढणारी ही वनस्पती पाणथळ जागी किमान 28 वर्षे ठाण मांडते. जलाशय सुकवण्याचं ‘काम’सुद्धा करते. एवढं करून ती नष्ट होत नाही. जलपर्णीची चिवट मुळं पावसाची, पाण्याची वाट बघत ‘डॉर्मन्ट’ होतात आणि दुर्वा-गवतासारखी पहिल्या जलसिंचनाने तरारून वर येतात आणि स्टोलोन्स म्हणजे ‘धावपटू’सारखी भरभर सर्वत्र ‘धाव’ घेतात!

बॉयन्ट किंवा तरंगण्याची क्षमता असलेली जलपर्णी जेव्हा संपूर्ण जलाशय व्यापते तेव्हा ती अक्षरशः उच्छाद आणते. अशा जलाशयातील पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन (प्राणवायु) कमी झाल्याने माशांना श्वास घेता येत नाही आणि ते नष्ट होतात. खोल जलाशयात, तळाला वाढणाऱ्या जलवनस्पतींना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने त्यांचा वेगाने ऱहास होतो. पाण्यातील ‘सत्त्व’ अशाप्रकारे कमी कमी होत गेल्याने पेयजलाची गुणवत्ता घसरते. नदी, तलावातून प्रवास करणाऱ्या छोटय़ा बोटींना जलपर्णीचा चिवट गुंता पार करणे कठीण जाते. तशा त्या वल्हं चालवताना काही काळ दूर होतात, पण तळाची तरंगती मुळं त्रासदायक ठरतातच. पोहणाऱ्या व्यक्तींनाही अशा पाण्यात पोहण्याचा मुक्त आनंद घेता येत नाही आणि मासेमारी करणंही कठीण होतं.

जलपर्णीला गुलाबी-जांभळ्या रंगाची सुंदर फुलं येतात. ही फुलं ट्रायस्टिलस किंवा तीन प्रकारची असतात. त्यातील बीजकणांचं वहन विशिष्ट प्रकारच्या माशा करतात. शिवाय या वनस्पतींच्या एखाद्या तुकडय़ापासूनही तिची वाढ होते. जलपर्णीच्या विस्ताराने ‘कोंडलेल्या’ जलाशयात डास-मच्छर वाढतात आणि साहजिकच मलेरियासारख्या रोगांना आयतेच आमंत्रण मिळते.

जलपर्णीची वाढ साधारणतः 12 ते 35 अंश सेल्सिअस तापमानादरम्यान होते. अतिशीत भागात जलपर्णी वाढत नाही. अन्यथा तिने आर्क्टिक आणि अंटार्क्टिक खंडही व्यापले असते. अशा या जलपर्णीचा ‘प्रादुर्भाव’ कसा कमी करायचा हा जगापुढचा एक मोठाच प्रश्न आहे. ‘गोल्डफिश’ (सोनेरी मासे) मात्र अन्नदात्री जलपर्णीवर खूश असतात. याशिवाय जलपर्णीचा फडशा पाडायला गेंडय़ांचे कळप उपयुक्त ठरतात. सतत पाण्यात डुंबणारा हा प्राणी जलपर्णी भसाभस खातो. परंतु शहरी भागातील जलाशयात जलपर्णीमारक गेंडे आणून ठेवणं हे मोकाट गवे किंवा रानहत्तींसारखं धोकादायक ठरू शकतं. म्हणून त्या फंदात कोणी पडत नाही. यंत्राने जलपर्णी काढायची तर दररोज 75 ट्रक भरून आणि 40 घनमीटरची जलपर्णी पाण्याबाहेर काढली तरी मोठय़ा (दल) सरोवरासारख्या ठिकाणी पसरलेल्या जलपर्णीचा नायनाट करायला वर्षभराचा अवधी लागेल. आफ्रिकेतील व्हिक्टोरिया तलावातील 3700 एकरांवरची जलपर्णी उपसायला असेच एक वर्षं लागले!

अर्थात, खर्चच करायचा तर जलपर्णीचा बायोमास म्हणून खतांसाठी किंवा बायोगॅस तयार करण्यासाठी उपयोग करता येतो. आपल्या देशात त्याचा विधायक वापर सहज शक्य आहे. एखाद्या आपत्तीचं ‘इष्टापत्तीत’ रूपांतर करून दाखवायला जलपर्णीचं आव्हान उपयुक्त ठरू शकतं. तशी इच्छाशक्ती मात्र पाहिजे.

5 ते 7 पोटॅन्शिअर हायड्रोजन किंवा पीएच असलेली जलपर्णी अल्कली गुणधर्माची आहे. जलपर्णीचा विधायक वापर करणं शक्य नसल्यास कीटकनाशकासारख्या फवाऱ्याने ती नष्ट करता येईल. परंतु त्यामुळे पेयजलही प्रदूषित होईल. या वनस्पतींची मुळं कुरतडणारे ‘विव्हिल’ प्रकारचे जंतू जलपर्णीचा त्रास कमी करण्यासाठी कितपत उपयुक्त ठरू शकतील यावर प्रयोग सुरू आहेत. थोडक्यात काय, तर निसर्गाची ही अफाट ‘देणगी’ आपल्याला उपकारक ठरेल असं संशोधन करून इंधनसमस्येवर खेडोपाडय़ातच उपाय सापडेल. आपण जलपर्णीकडे तारक-मारक यापैकी कोणत्या दृष्टीने पाहतो हे महत्त्वाचं!

विनायक