Who is Baba Siddique – कोण होते बाबा सिद्दीकी? मूळचे बिहारचे असलेल्या सिद्दीकींनी मुंबईत कसा बसवला जम?

माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्र्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माजी आमदार असलेले बाबा सिद्दीकी यांची बॉलिवूडमध्येही चांगली ओळख होती. त्यांची इफ्तार पार्टी नेहमी चर्चेत असायची. मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दीकी मुंबईकर कसे झाले, आमदार कधी झाले आणि बॉलिवूडमध्ये त्यांचे मित्र कसे झाले जाणून घेऊयात.

सिद्दीकी यांचा जन्म बिहारच्या पाटण्यात झाला. पण ते वाढले मुंबईत. काँग्रेसची विद्यार्थी शाखा नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियातून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरूवात केली. पुढे त्यांची ओळख काँग्रेस नेते आणि अभिनेते सुनील दत्त यांच्याशी झाली. तेव्हापासून ते काँग्रेसमध्ये मोठे नेते मानले जात होते. 1992 साली पहिल्यांदा सिद्दीकी यांनी महापालिकेची निवडणूक लढली आणि जिंकली. 1992 आणि 1997 साली ते नगरसेवक म्हणून निवडून आले. 1999 साली त्यांनी वांद्रे पश्चिममधून पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली. 1999 ते 2014 पर्यंत त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. सिद्दीकी हे काँग्रेस काळात राज्यमंत्रीही राहिले होते. 2014 साली भाजप उमेदवार आशिष शेलार यांच्याविरोधात त्यांच्या पराभव झाला.

सिद्दीकी आणि दत्त कुटुंबीयांचे चांगले संबंध होते. 2005 साली लोकसभा पोटनिवडणुकीत बाबा सिद्दीकी यांनी प्रिया दत्त यांचा जोरदार प्रचार केला होता. या निवडणुकीत दत्त यांचा विजय झाला होता.

बांद्र्याचे आमदार असल्याने त्यांचे बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्यांची चांगली ओळख होती. सिद्दीकी हे संजय दत्त, सलमान खान आणि शाहरुख खान यांचे मित्र होते. सिद्दीकी दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करायचे. यावेळी बडे बॉलिवूड सेलिब्रिटी या पार्टीला हजर रहायचेय. 2013 च्या सिद्दीकी यांच्याच इफ्तार पार्टीत सलमान खान आणि शाहरुख खानचे मनोमिलन झाल्याचे सांगितले जाते.

मनी लॉण्डरिंग केस प्रकरणी सिद्दीकी यांच्यावर ईडीची धाड पडली होती. 2012 साली एका एसआरए प्रकरणी ही धाड पडली होती. वांद्रे रेक्लमेशनवर एक एसआरएची इमारत बांधली जाणार होती. या इमारतीचे कंत्राट सिद्दीकी यांच्याशी संबंधित कंपनीला दिल्याचा आरोप झाला होता.

बाबा सिद्दीकी यांचे पुत्र 2019 साली वांद्रे पूर्वमधून पहिल्यांदा आमदार झाले होते. वडिलांनी काँग्रेस सोडल्यानंतर झिशानही अजित पवार गटात सामील होतील असे सांगितले जात होते.