गुजरातधार्जिणे सरकार हद्दपार करून महाराष्ट्र वाचवणे हेच मविआचे लक्ष्य! – नाना पटोले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचे पाप केले, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नाही. शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप शिंदे फडणवीस सरकारने केले आहे. महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणे, हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

वांद्रे पश्चिम येथील हॅाटेल ताज लॅंडस् एन्डमध्ये महाविकास आघाडीने राज्यातील महाभ्रष्ट युती सरकारच्या काळ्या कारभाराचा ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

नाना पटोले म्हणाले की, माजी मंत्री आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने महाराष्ट्र हादरला. शाळेतील मुली सुरक्षित नाहीत, महिला सुरक्षित नाहीत. राज्यातली जनता सुरक्षित नाही आता तर सत्तेतील लोकही सुरक्षित नाहीत. कायदा सुव्यवस्था बिघडली आहे आता महायुतीच्या मंत्र्यांचे राजीनामे मागितले जाणार नाहीत तर जनताच यांना सत्तेतून खाली खेचेल.

महाराष्ट्र ही मोदी-शहांच्या गुलामांची वसाहत झालीय, सरकार घालवावंच लागेल; उद्धव ठाकरे यांचा निर्धार

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना असंवैधानिक पद्धतीने पदावर बसवले आहे, काँग्रेसने त्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्ष त्यांच्या विचारांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर बसवून लोकशाहीचा खून करण्याचे काम करत आहे. रश्मी शुक्ला हे त्याचेच एक उदाहरण आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही, पीक विम्यातून शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. अतिवृष्टीनंतर केंद्राचे पथक आंध्र प्रदेशात गेले पण महाराष्ट्रात आले नाही. महाराष्ट्रात दररोज 7 शेतकरी आत्महत्या होत आहेत. तरुण मुले शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत पण या सरकारने सर्व उद्योग व रोजगार गुजरातला पळवले आहेत, आता हे सरकार घालवले पाहिजे, असा निर्धार पटोले यांनी व्यक्त केला.