Baba Siddique murder – कुर्ल्यात भाड्यानं राहिले, दीड महिना घराची रेकी केली अन्… आरोपींनी पोलिसांना काय सांगितलं?

अजित पवार गटाचे नेते, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे येथे गोळीबार झाला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गुरमैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी आरोपींची नावे आहेत. गुरमैल हरियाणा, तर धर्मराज उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. त्याचे नाव शिवा असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

पोलिसांनी आरोपींविरोधात निर्मल नगर पोलीस स्थानकात भादवी कलम 103(1), 109, 125 आणि 3(5), आर्म्स अॅक्टमधील कलम 3, 25, 5 आणि 27, तसचे महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 37 आणि 137 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी आता आणखी एक माहिती समोर आली आहे. हत्येआधी आरोपींनी बाबा सिद्दिकी यांच्या घराची आणि कार्यालयाची रेकी केली होती. गेल्या दीड महिन्यांपासून हे आरोपी त्यांच्यावर पाळत ठेऊन होते. त्यांनी मुंबईतील कुर्ला या भागामध्ये भाड्याने घरही घेतले होते. घरभाडेही त्यांना आगाऊ भरले होते.

Baba Siddique Murder – बॉलिवूड शोकसागरात, सलमान-संजय दत्तची धावपळ; शिल्पाला अश्रू अनावर, रितेशची संतप्त पोस्ट

रेकी केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी संधी साधत आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. यातील एक गोळी छातीत, तर दोन पोटात लागल्याने बाबा सिद्दिकी गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

पिस्तूलमधून गोळीबार

एका कार्यक्रमाला जात असताना रात्री साडे नऊच्या सुमारात तीन आरोपींनी अत्यंत जवळून बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपींनी 9.9 एमएम पिस्तूलमधून सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. यातील काही गोळ्या सिद्दिकी यांना लागल्या, तर काही त्यांच्या गाडीला लागल्या. घटनास्थळी पोलिसांना तीन गोळ्यांची काडतुसेही मिळाली आहेत.

Baba Siddique murder – राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी करावी; संजय राऊत आक्रमक

डॉक्टरांनी काय सांगितले?

लिलावती रुग्णालयातील डॉ. जलील पारकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शनिवारी रात्री साधारण साडे नऊच्या सुमारास बाबा सिद्दिकी यांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात ठेवण्यात आली. त्यांची नाडी मिळत नव्हती. रक्तदाबही दाखवत नव्हता. ईसीजी काढल्यानंतर फ्लॅट लाईन आली. रक्तस्त्राव थांबावा आणि रक्तदाब वाढावा यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली, मात्र 11.25 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.