रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हृदयविकाराने मृत्यू

देशभरात नवरात्रोत्स मोठ्या उत्साहात पार पडला. देवीच्या सार्वजनिक मंडळात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना दिल्लीत आणखी एक धक्कादायक घटना घडली. दक्षिण दिल्लीतील चिराग दिल्ली परिसरात रामलीलाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या वर्षीच्या शारदीय नवरात्रोत्सवात रामलीलामध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. विक्रम तनेजा (60) असे त्या कलाकाराचे नाव आहे. दक्षिण दिल्लीतील चिराग दिल्ली परिसरात नवरात्रीनिमित्त रामलीला नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकात विक्रम तनेजा यांनी कुंभकर्णाची भूमिका साकारली होती. दरम्यान हे नाटक सुरू असताना विक्रम यांच्या छातीत दुखू लागले. याबाबत त्यांनी त्यांच्या इतर सहकार्यांना कल्पना दिली.

विक्रम यांची तब्येत अचानक ढासळल्याने त्यांना तात्काळ दिल्लीतील एका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेमुळे त्याच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या वर्षीच्या नवरात्रीत रामलीलामध्ये भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी शाहदरा परिसरात नवरात्रीनिमित्त रामलीलाच्या मंचकादरम्यान रामाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मृत्यू झाला होता.