वेबसीरिज- बाहुबली होण्याचा प्रवास

 

>> तरंग वैद्य

अपराधाच्या दलदलीत रुतत जात बाहुबली होण्याचा प्रवास मांडणारी ‘मिर्झापूर-3’ वेबसीरिज जुलै महिन्यात आली. आधी प्रमाणेच हा सीझनही तितकाच लोकप्रिय ठरला. मालिकेचे बलस्थान हिंसा असल्याने रक्तरंजित दृश्ये आणि अपशब्दांनी भरलेली ही मालिका नेमक्या प्रेक्षकवर्गाला खिळवून ठेवते.

मध्यमवर्गातील दोन  भाऊ, विशीतील वय… वडील वकील, साधारण आयुष्य जगणारा परिवार अशी ही दोन मुलं अन्यायाविरुद्ध उभी राहतात, पण त्यांच्या लक्षात येतं की, ज्यांच्याविरुद्ध ते लढले ते तिथल्या बाहुबलीची माणसं आहेत. मुंबईच्या भाषेत आपण ज्यांना ‘भाई’ किंवा ‘डॉन’ म्हणतो, उत्तर प्रदेश, बिहारकडे त्यांना ‘बाहुबली’ म्हटलं जातं. काम तेच. खंडणी, लुटालूट, हत्या. थोडक्यात पैसा आणि प्रभावासाठी सर्व अपराधिक गतिविधींमध्ये सहभाग. तर अशा एका बाहुबलीच्या विरोधात गेल्यामुळे या दोन मुलांचं जगणं  कठीण होऊन जातं आणि ‘करो या मरो’चा वापर करत ते या युद्धात उतरतात आणि पुढे अपराधाच्या दलदलीत रुतत जातात. ही कथा आहे अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेल्या ‘मिर्झापूर’ नावाच्या वेब सीरिजची. साधारण

35-38 मिनिटांचे एकूण नऊ भाग. उत्तर प्रदेशातील बाहुबलींचे आयुष्य, त्यांचे राहणीमान, त्यांचा समाजात प्रभाव आणि नेते आणि पोलिसांशी त्यांचे संबंध दाखवणारी ही मालिका रक्तरंजित आणि अपशब्दांनी भरलेली आहे. त्यामुळे लहान मुलांसोबत तसेच ज्यांना हिंसा किंवा अपशब्दांचा वापर आवडत नाही, त्यांनी ही मालिका बघणं टाळावं.

वरील कथा ‘मिर्झापूर – भाग 1’ची आहे. 23 नोव्हेंबर 2020 ला दहा भाग असलेली ‘मिर्झापूर-2’ आणि या 5 जुलै 2024 रोजी ‘मिर्झापूर-3’चे आणखी दहा भाग आले. पहिल्या भागात या दोन मुलांपैकी एकाची हत्या होते. पुढे उरलेला म्हणजेच गुड्डू कसं आपलं वर्चस्व स्थापित करतो आणि सध्याच्या ‘बाहुबली’ला संपवून स्वत ‘बाहुबली’ बनतो आणि तेच सगळं करतो जे इतर ‘बाहुबली’ करतात. प्रदेशात असे अनेक ‘बाहुबली’ असतात. त्यांचा म्होरक्या बनायचा त्याचा प्रयत्न ही पुढच्या दोन भागांची थोडक्यात कथा. यात राजकारण आलं, सत्ताधाऱयांचा संबंध आला, पोलिसांशी साटंलोटं, भांडणं, मारामाऱया, हत्या… सर्वच आलं. बंदुका, मशीनगनचा सढळ हाताने वापर केला आहे. पहिल्या भागात अंगठा कापतानाचे दृश्य आहे, तर तिसऱया भागात एका कोवळ्या तरुणाचे मुंडकं छाटताना दाखवलं आहे. भाग-3 – एपिसोड 8 मध्ये बोटं डोळ्यात घालून डोळे फोडण्याचं चित्रीकरण बघवत नाही.

प्रत्येक जिह्याचा एक कलेक्टर असतो तसेच उत्तर प्रदेशात प्रत्येक जिह्याचा एक ‘बाहुबली’ असतो. या ‘बाहुबलीं’चीही एक संघटना असते. त्यांच्या बैठका होतात हे ही मालिका बघताना समजतं. उत्तर प्रदेश, बिहारसारखे प्रदेश कायदा आणि सुव्यवस्थेबाबत इतर प्रदेशांच्या तुलनेत कमी लेखले जातात. पण आता  परिस्थिती झपाटय़ाने बदलते आहे.

‘कालीन भैया’ म्हटलं की, मिर्झापूरमधील पंकज त्रिपाठी. एवढी ही भूमिका गाजली. इतका मोठा प्रभावशाली व्यक्ती असूनही शांत, विचार करून निर्णय घेणारा ‘बाहुबली’ पंकज यांनी उत्तम निभावला आहे. हत्या किंवा हत्येचा आदेश देणं त्याच्यासाठी श्वास घेण्यासारखंच आहे हे त्याच्या संवादफेकीतून परिणामकारकरीत्या समोर येतं. श्रिया पिळगावकर आता उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. ‘मिर्झापूर’ तिची पहिली मोठी मालिका. इथे तिने स्वाभाविक अभिनय काय हे दाखवून दिले आहे. तिची लहान बहीण झालेली श्वेता त्रिपाठी म्हणजेच गोलू गुड्डूच्या साथीने आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेते आणि गुन्हेगारी विश्वात आपले पाय भक्कम रोवते. श्वेताचा अभिनय दमदार आहे. गुड्डू (अली फझल) खऱया अर्थाने या वेब सीरिजचा हीरो असून त्याने आपली जबाबदारी पूर्णपणे निभावली आहे. पांत मेस्सी, दिब्येंदू शर्मा, विजय वर्मा, राजेश तेलंग, शिबा चा ही नावं आता वेब सीरिज जगातली मोठी नावं. त्यांनी आपल्या नावाचा मान राखला आहे. एका ‘बाहुबली’ची बायको म्हटलं की, काय काय झेलावं लागतं हे रसिका दुग्गलने आपल्या अभिनयातून दाखवून दिले आहे. मालिकेत कुलभूषण खरबंदा, लिलिपुटसारखे नावाजलेले अभिनेतेही आहेत, जे आपल्या कामाशी प्रामाणिक आहेत.

संपूर्ण मालिकेचे चित्रीकरण उत्तर प्रदेश येथे झाले आहे. मोठय़ा हवेल्या, रस्ते, बाह्य दृश्ये कल्पकतेने चित्रित केली आहेत. मालिकेचे बलस्थान हिंसा आहे. त्यामुळे ‘अॅक्शन डायरेक्टर’ खूप महत्त्वाचा. अॅक्शन दृश्यं अंगावर काटा येईल अशा पद्धतीने प्रस्तुत केली आहेत.

वेब सीरिज अस्तित्वात आल्या तेव्हापासून आजपर्यंत अनेक मालिका आल्या, पण आजही प्रेक्षकांच्या पसंतीतल्या पहिल्या तीन मालिकांमध्ये ‘मिर्झापूर’चे नाव आहे हे विशेष.

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)