>> अरुणा कळसकर
मुलांचे व्यक्तिमत्त्व साकारताना… या पालकत्वाच्या प्रवासात पडलेल्या प्रश्नांची शास्त्रीय उत्तरं देणाऱया सचिन उषा विलास जोशी यांच्या पुस्तकाचे मी अतिशय बारकाईने वाचन केले. पुस्तकाची पहिली आवृत्ती 15 एप्रिल 2023 आणि तिसरी आवृत्ती 1 मे 2023 रोजी प्रकाशित झाली. याचाच अर्थ पुस्तकाची उपयोगिता सांगतो. ‘पालकत्वाच्या प्रवासात… शास्त्रीय उत्तरे देणारे’ ही पुस्तकाची टागलाइन सार्थ करणारे, चिंतन करायला लावणारे पुस्तक आहे.
लेखक सचिन जोशी उच्चशिक्षित असून शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कार्य पाहून मन अचंबित होते. त्यांच्या लिखाणातून पाल्याविषयीची कळकळ दिसून येते. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात उत्तम शिक्षण तज्ञांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तके लिहिली आहेत. पण पालकांना मार्गदर्शन करणारे, पालकांना पडणाऱया आजच्या काळातील समस्यांची उकल करण्यास मदत करणारे हे पुस्तक पालकांना निश्चितच आवडेल. वृत्तपत्रांतून आपण बहुतेक रोजच, पौगंडावस्थेतून जाणाऱया विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यातून त्यांना आलेले नैराश्य आणि त्यातून घडणाऱया हिंसक घटना वाचतो. अशा घटना कशा प्रकारे हाताळाव्यात किंवा अशा समस्या उद्भवूच नयेत यासाठी पाल्याशी पालकांचे वर्तन कसे असावे याचे उत्तम मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते. जीवनाची जडणघडण घरबांधणीप्रमाणे सावकाशीने व सावधपणे करायची असते हे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे विचार…त्याचा प्रत्यय हे पुस्तक वाचताना पानोपानी येतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे. छोटय़ाशा रोपटय़ाला हळुवारपणे थेंबाथेंबाने पाणी घालणारा हात! पालकत्वाच्या प्रवासात मुलांच्या भावनिक, मानसिक, शारीरिक, शैक्षणिक अशा चारही बाजूंचा अभ्यास करण्याची गरज असते हे सांगत दिशादर्शकाचे काम हे पुस्तक करते.
मुलांचे व्यक्तिमत्त्व साकारताना
प्रकाशन : साकेत प्रकाशन लेखक : सचिन उषा विलास जोशी
पृष्ठसंख्या : 293 किंमत : 350 रुपये