भाजप नेत्यांकडून अजित पवारांना बाजूला करण्यात येत आहे; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

महायुतीत सर्व आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच सन्मानजनक जागा मिळाल्या नाही, तर वेगळा निर्णय घेण्याचा इशारा अजित पवार गटाने घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. महायुतीतील या रस्सीखेचीबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला चांगलाच टोला लगावत महायुतीतील गटबाजीवर भाष्य केले आहे. भाजप नेत्यांकडून अजित पवार यांना साइड ट्रॅक करण्यात येत आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक वेळेला विविध खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सध्या शिस्त बिघडली असून कोणताही ताळमेळ नसलेला कारभार सुरू आहे. तिजोरीत पैसे नसताना जीआर काढले जात आहेत. हे निर्णय टक्केवारीसाठी केले जात आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले. अजित पवार यांनी कुठे जावे, हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने त्यांची माणसे निघून जात आहेत, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.