लेख – झाकीर नाईक पाकिस्तानात का गेला?

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

झाकीर नाईक भारतातील मुस्लिमांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडत आहे. मलेशिया, टर्की, पाकिस्तान,सौदी अरेबिया, सीरिया, इराण अशा देशांकडून झाकीर नाईकला आर्थिक तसेच अन्य मार्गांनी पाठबळ दिले जात आहे. झाकीर भारतातील मुस्लिमांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडत आहे 

स्वयंघोषित इस्लामिक धर्मगुरू आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी झाकीर नाईक पाकिस्तानात दाखल झाला आहे. पाकिस्तानात त्याचं भव्य स्वागत करण्यात आलं. तिथे त्याची भेट घेण्यासाठी अनेक मोठय़ा नेत्यांनी रांग लावली. झाकीर नाईक हा भारतातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांच्या यादीतला एक गुन्हेगार आहे.

त्याने नेहमीप्रमाणे भारताविरोधात गरळ ओकली आहे. भारतातील प्रस्तावित वक्फ बोर्ड विधेयकाविरोधात सर्व मुस्लिमांनी एकत्र येण्याचं त्याने आवाहन केलं आहे.

पाकिस्तानमध्ये झाकीर नाईकच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं. 30 सप्टेंबर ते 28 ऑक्टोबरपर्यंत तो पाकिस्तानमध्येच मुक्काम करणार आहे. पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते व पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे निकटवर्ती राणा मशहूद, धार्मिक व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सय्यद अला-उर-रहमान, धार्मिक व्यवहारांचे संसदीय सचिव शमशेर मजारी आणि इतर नेते नाईकच्या स्वागतासाठी इस्लामाबाद विमानतळावर हजर होते.

58 वर्षीय झाकीर नाईकचा जन्म मुंबईत झाला. त्याने वैद्यक शास्त्रात उच्च शिक्षण घेतलं आहे. वयाच्या 20 व्या वर्षापासूनच तो धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होऊ लागला होता. तसेच पुढे त्याने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) नावाची संस्था स्थापन केली. मात्र यूएपीए 1967 च्या कायद्यानुसार भारत सरकारने या संस्थेवर बंदी घातली आहे. पुढे नोव्हेंबर 2021 मध्ये या संस्थेवरील बंदी पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली होती. झाकीर नाईकवर धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्यावर देशात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. यासह तो अनेक बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. तो दहशतवादी पथकाच्या रडारवर होता. मात्र त्याला पकडण्यापूर्वीच त्याने मलेशियाला पलायन केले.

झाकीर नाईक पीस टीव्हीवर धार्मिक प्रवचन द्यायचा. या माध्यमातून तो इतर धर्मांविरोधात द्वेष पसरवायचा. या पीस टीव्हीची स्थापना 2006 साली झाली होती. मात्र सध्या पीस टीव्हीवर भारतासह कॅनडा, ब्रिटन, बांगलादेश अशा अनेक देशांत बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने झाकीर नाईकच्या आयआरएफ या संस्थेवरही गंभीर आरोप केलेले आहेत. या संस्थेमुळे शांतता तसेच सामाजिक स्वास्थ्य, बंधुता बिघडण्याची शक्यता आहे .

2016 साली बांगलादेशमध्ये काही अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात अनेक लोकांना मृत्यू झाला. अतिरेक्यांनी हे कृत्य करण्यापूर्वी झाकीर नाईक याचे भाषण ऐकले होते, ज्याचा प्रभाव त्यांच्यावर झाला होता. केरळमधील अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसमधील प्रवाशांवर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिल्याची धक्कादायक घटना 2 एप्रिल 2023 रोजी घडली. या घटनेप्रकरणी मूळचा दिल्लीमधील शाहीनबाग येथील रहिवासी असलेला शाहरुख सैफी याला पोलिसांनी अटक केली . या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपीने ‘‘मला कथित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक याच्याकडून प्रेरणा मिळाली आहे’’ असे सांगितले आहे.

2019 साली मलेशियामध्ये झाकीर नाईकने हिंदू आणि चिनी नागरिकांसंदर्भात वादग्रस्त विधान केले . या विधानामुळे मलेशियामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान महाथीर यांनी झाकीर नाईक याच्याकडून धार्मिक भावना भडकविण्याचे काम केले जात आहे, अशा भावना व्यक्त केल्या. तेव्हापासून तेथे झाकीर नाईकवर सार्वजनिक सभांमध्ये बोलण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

झाकीर नाईक मलेशियाच्या सरकारी संरक्षणात

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम भारत दौऱ्यावर आले. 20 ऑगस्ट 2024ला मोदींबरोबरच्या भेटीनंतर त्यांनी इंडियन कौन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्समध्ये आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी त्यांना वादग्रस्त कथित इस्लामिक धर्मगुरू व अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर इब्राहिम अन्वर म्हणाले, झाकीर नाईक विरोधातील सक्षम पुरावे आम्हाला मिळाले तर त्यावर उचित कार्यवाही केली जाईल, परंतु याबाबतची कोणतीही कार्यवाही करताना दोन्ही देशांमधील संबंधांवर नकारात्मक परिणाम होता कामा नयेत, अशी आमची भावना आहे. अन्वर म्हणाले, आमचं सरकार झाकीर नाईक प्रकरणी भारत जे कोणते पुरावे सादर करेल, त्याचं स्वागतच करेल. ते पुरावे आम्ही विचारात घेऊ. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी आम्ही भारत सरकारबरोबर मिळून काम करत आहोत. मात्र त्यानंतर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही.

सध्या पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे प्रचंड हिंसाचार सुरू आहे.  नागरिक पाकिस्तान सरकारच्या विरोधात निदर्शने करत आहेत, महागाई वाढलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये झाकीर नाईकच्या प्रवचनांमुळे धर्माच्या छत्राखाली नागरिक एकत्र येतील आणि आपल्या सरकारच्या विरोधातील त्यांच्या कारवाया थांबवतील, अशी पाकिस्तानला आशा वाटत आहे. मात्र तसे काहीच होताना दिसत नाही. उलट कराची विमानतळावर 7 ऑक्टोबरला झालेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये तीन चिनी नागरिक मारले गेले. त्यानंतर चिनी नागरिकांकरिता एक ऍडव्हायझरी जारी केली गेली की, पाकिस्तान हा धोकादायक देश आहे आणि चिनी नागरिकांनी तिथे जाऊ नये.पुढच्याच आठवड्यामध्ये पाकिस्तानमध्ये चिनी नेतृत्वाखाली शांघाय सहकार्य ऑर्गनायझेशनची (SCO) बैठक आता कशी होईल, याविषयी पाकिस्तान सरकारला काळजी वाटत आहे.

\[email protected]