महिन्याभराने सापडला बेपत्ता पायलटच्या मृतदेह, गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्याजवळ कोसळले होते हेलिकॉप्टर

हिंदुस्थानच्या तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर गेल्या महिन्यात कोसळले होते. गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडडली होती. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या हिंदुस्थानच्या तटरक्षक दलाच्या वैमानिकाचा मृतदेह आता महिन्याभरानंतर आढळला आहे.

ALH MK-III हेलिकॉप्टर पोरबंदरजवळ अरबी समुद्रात 2 सप्टेंबर रोजी कोसळले होते. या दुर्घटनेत तीन क्रू मेंबर्स बेपत्ता झाले होते. दोन क्रू मेंबर्सचे मृतदेहनंतर बाहेर काढण्यात आले. मात्र, मिशन पायलट राकेश कुमार राणा हे बेपत्ता होते, त्यांचा शोध सुरूच होता. 10 ऑक्टोबर रोजी पोरबंदरच्या नैऋत्येला सुमारे 55 किमी समुद्रातून राकेश राणा याचा मृतदेह सापडला, असे तटरक्षक दलाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यासोबतच सेवा परंपरेनुसार पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.

पोरबंदर किनाऱ्यापासून सुमारे 30 नॉटिकल मैल अंतरावर हरी लीला मोटार टँकरमधील जखमींना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात चार क्रू सदस्यांसह तटरक्षक दलाचे प्रगत हलके हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले होते. हेलिकॉप्टरमधील चार क्रू मेंबर्सपैकी एक गोताखोर गौतम कुमार यांना तात्काळ वाचवण्यात आले, तर तीनजण बेपत्ता होते. एका दिवसानंतर पायलट विपिन बाबू आणि गोताखोर करण सिंह यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पण राणा बेपत्ता होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू होती. गुजरातमध्ये पोरबंदर आणि द्वारका जिल्ह्यांतील विविध भागात बचावकार्य करण्यात आले.