काही नेत्यांनी वैयक्तिक हितांना प्राधान्य दिल्याने हरयाणात पराभव, राहुल गांधी यांनी व्यक्त केला तीव्र संताप

राज्यातील काही स्थानिक नेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक हितांना प्राधान्य दिल्यामुळे आपल्याला हा पराभव पहावा लागला, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरयाणातील निवडणूक निकालावर संताप व्यक्त केला आहे. हरयाणातील पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसची चिंतन बैठक बोलावली होती. या बैठकीत राहुल गांधी यांनी स्थानिक नेत्यांवर संताप व्यक्त केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ही बैठक पार पडली.

काँग्रेसने पराभवानंतर चिंतन समिती गठीत केली असून जी राज्यातील काँग्रेसच्या पराभवाचे विश्लेषण करेल आणि आगामी निवडणुकांची तयारी करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील काही नेत्यांनी स्वतःच्या हिताच्या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले. त्यामुळे पक्ष मागे पडला. या लोकांनी पक्षाच्या हिताला बगल देत वैयक्तिक फायदे मिळवण्याला प्राधान्य दिले, असे सांगत राहुल गांधी यांनी स्थानिक नेते आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांवरील नाराजी जाहीर केली. बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे सरचिटणीस के. सी वेणुगोपाल, हरयाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदय भान, भूपेंद्रसिंह हुड्डा, काँग्रेसचे हरयाणा प्रभारी दीपक बाबरिया. हरयाणा पर्यवेक्षक अशोक गेहलोत उपस्थित होते.

काय घडले बैठकीत?

अर्ध्या तासात बैठक पूर्ण झाली. पराभवाच्या कारणांवर आम्ही चर्चा केल्याचे बैठकीनंतर काँग्रेस नेते अजय माकन प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. केवळ निवडणूक आयोगापासून नेत्यांमधील मतभेदांपर्यंत मर्यादित नाहीत. पराभवाच्या वेगवेगळय़ा कारणांवर साधकबाधक चर्चा झाली, असे अजय माकन यांनी सांगितले.

मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू

शपथविधीपूर्वी उपमुख्यमंत्री आणि मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार महिपाल धांडा आणि राज्यसभा खासदार कृष्णलाल पनवार यांनी दिल्लीत तळ ठोकल्याचे चित्र आहे. राजस्थान आणि यूपीच्या धर्तीवर भाजप हरयाणात दोन उपमुख्यमंत्री नियुक्त करू शकते. दरम्यान, राज्यसभा खासदार कार्तिकेय शर्मा यांनी दिल्लीत नायब सैनी यांची भेट घेतली. आई शक्ती राणी शर्मा यांनी कालका मतदारसंघातून निवडणूक जिंकली. याशिवाय राज्यसभा खासदार किरण चौधरी आणि तोशामधून निवडणूक जिंकलेल्या त्यांची मुलगी श्रुती चौधरी यांनी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पुढे ढकलला

नायब सैनी हे 12 ऑक्टोबरला हरयाणाचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार होते. पंचकुला येथील परेड ग्राऊंडवर ही शपथविधीची तयारी सुरू झाली होती. गर्दी जमवण्यासाठी सरकारी बसेसचीही मागणी करण्यात आली होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱयामुळे शपथविधी पुढे ढकलण्यात आला. शपथविधी 15 ऑक्टोबरपर्यंत कधीही होऊ शकतो. बैठकीला दोन केंद्रीय निरीक्षक उपस्थित राहाणार असून सैनी हे अद्याप दिल्लीतच आहेत. दिल्लीत हरयाणाचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते.