मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी जोरावर असतानाच काल राज्य सरकारने पंधरा नव्या जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या राज्य सरकारच्या शिफारसीवर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. ‘ही शिफारस करताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतले का’ असा खोचक सवालही त्यांनी केला.
आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारने पंधरा जातींचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र त्याकडे राज्य सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. हा निर्णय घेताना महाविकास आघाडीकडून लिहून घेतले का, असा टोलाही त्यांनी लगावला. आता या जाती ओबीसी प्रवर्गात घातल्याने आरक्षण कमी झाले नाही का, असा सवालही त्यांनी केला.
प्रत्येक आंदोलनाच्या वेळी शिष्टाईसाठी येणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही मनोज जरांगे यांनी हल्लाबोल केला. महाजन हे संकटमोचक नसून ‘पांचटमोचक’ असल्याची खिल्ली त्यांनी उडवली. छगन भुजबळ हे डुप्लिकेट असून त्यांनीच मराठा आरक्षणात अडथळा आणल्याच्या आरोपाचा जरांगे यांनी पुनरुच्चार केला.