लाडकी बहीण मतं विकत घेण्याची योजना, महिलांविषयी प्रेम कमी अन् व्यापार, व्यवहार जास्त! – संजय राऊत

महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची मतांसाठी फसवाफसवी सुरू आहे. ही योजना मतं विकत घेण्याची योजना असून यात महिला किंवा बहि‍णींविषयी प्रेम कमी अन् व्यापार, व्यवहार जास्त आहे. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेची काय स्थिती आहे हे त्यांनी जाहीर करावे. खाई त्याला खवखवे. मी खरे बोललो म्हणून त्यांना पटले नसेल, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावरून राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले. त्याला उत्तर देताना राऊत यांनी हे विधान केले. ते माध्यमांशी बोलत होते.

वरळी विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उतरवण्याचे प्रयत्न आहेत. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पण वरळीमध्ये आदित्य ठाकरे पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील आणि विधानसभेत जातील.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला त्रास देण्यासाठी किंवा शिवसेनेविरोधात काम करण्यासाठी हे सगळे निर्णय दिल्लीत अमित शहा किंवा नरेंद्र मोदी घेतात. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उभे करण्याचा निर्णय कुणी घेतला? हा निर्णय अजित पवारांचा नसावा. हा निर्णय अमित शहा यांनी घेतलेला आहे.

भावाच्या विरुद्ध भाऊ, बहिणीच्याविरुद्ध भाऊ उभा करायचा हे सगळे विकृत कामं या पक्षात चालतात. अशा प्रकारचे निर्णय दिल्लीत घेतले जातात आणि दिल्लीतील सध्याचे राज्यकर्ते हे मराठी माणसाचे व महाराष्ट्राचे शत्रू आणि दुष्मन आहेत. याचा बदला आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जनता घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.