…तर फडणवीसांना मी ओवाळेन! – सुप्रिया सुळे

राज्यावर 45 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे व सरकार 48 हजार कोटी रुपयांच्या रिंगरोडच्या कामाच्या निविदा काढत आहेत. ठेकेदार त्यांची बिले निघत नसल्याने ओरडत आहेत. त्यामुळे राज्यातील जनतेला हे सरकार काय करते आहे, याची पूर्ण माहिती आहे. राज्यात पुण्याची ओळख गुन्ह्याची राजधानी अशी होत चालली आहे. ती फडणवीस यांनी कमी केली तर मीच त्यांना पहिला हार घालेल व ओवाळेलही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

मार्केटयार्ड येथील निसर्ग कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शरद पवार यांच्या उपस्थितीत झाल्या. त्यानंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. हरियाणातील जनतेने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हला उत्तर दिले, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर सुळे म्हणाल्या, “प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगवेगळे असतात. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती पूर्णपणे बिघडली आहे. अर्थखात्यानेच सरकारला आता तुम्ही कोणताही खर्च करू शकत नाही, असा अहवाल दिला असल्याची माहिती आहे.”

आमच्या पक्षाकडे वाढता ओघ आहे असा दावा करून सुळे म्हणाल्या, “पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असे एकूण 1600 अर्ज आले होते. स्वतः शरद पवार बहुतेकांबरोबर बोलले. त्यांचे आम्हाला सांगणे आहे की फक्त उमेदवारी अर्ज केला त्यांचाच नाही तर त्यांच्याबरोबर आलेल्या प्रत्येकाचा सन्मान राखला गेला पाहिजे. आम्ही काही सर्वांना उमेदवारी देऊ शकणार नाही, पण आमच्याकडे आलेल्या कार्यकर्त्यांना संघटनेत, सत्ता आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्था, बँका, सहकारी संस्थांमध्ये सामावून घेऊ. कामाची संधी प्रत्येकाला मिळायला हवी.”