हरयाणात 20 जागांवर ईव्हीएम हॅक, काँग्रेसने दिले पुरावे; चौकशी होत नाही तोपर्यंत मशीन सील करण्याची मागणी

हरयाणा विधानसभा निवडणुकीत तब्बल 20 जागांवर ईव्हीएम मशीन हॅक झाल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगाने याचा कसून तपास करावा आणि जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मशीन सील करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस नेत्यांनी आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आपल्या तक्रारींबाबतचे पुरावे सादर केले. याबाबतची लेखी तक्रार देण्यात आली. अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, हरयाणात दसऱ्यानंतरच सरकार स्थापन होईल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

20 जागांवर ईव्हीएम हॅक

पवन खेरा, के.सी. वेणुगोपाल, अशोक गहलोत, अजय माकन आणि भुपेंद्र सिंह हुडा यांनी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. 20 जागांवर ईव्हीएम हॅक झाले होते. त्यापैकी 7 जागांचे पुरावे आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर केले असून 13 जागांचे पुरावे पुढच्या 48 तासांत सादर करू असे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. दरम्यान, काँग्रेस जिंकेल असे चित्र असताना काँग्रेसचा पराभव झाला. हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री भुपिंदर सिंह हुड्डा यांनी दिली.

दोन उपमुख्यमंत्री

हरयाणा विधानसभेत नवे सरकार स्थापन करण्याच्या वेगवान हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. हरयाणामध्येही मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीगड, ओडिशाप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री बसवले जाऊ शकतात असे सूत्रांचे म्हणणे आहे.

सत्याचा संघर्ष सुरूच राहणार – राहुल गांधी

जम्मू कश्मीरच्या लोकांचे मनःपूर्वक आभार. देशाच्या संविधानाचा हा विजय आहे, लोकशाहीच्या स्वाभिमानाचा विजय आहे, अशी प्रतिक्रीया लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे. आम्ही हरयाणातील अनपेक्षित निकालाचे विश्लेषण करत आहोत. तक्रारींची माहिती निवडणूक आयोगाला देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पाठिंब्याबद्दल हरयाणावासीयांचे आणि आमच्या बब्बर शेर कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे आभार. सत्याचा हा संघर्ष असाच सुरु राहील. तुमचा आवाज बुलंद करत राहाणार, असेही म्हटले आहे.