156 वर्षांचा वैभवशाली वारसा असलेल्या टाटा समूहाला यशोशिखरावर नेणारे, टाटा आणि विश्वास ही नाळ घट्ट करणारे, हिंदुस्थानच्या उद्योगक्षेत्रासाठी अतुल्य योगदान देणारे टाटा समूहाचे आधारवड, ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण रतन नवल टाटा यांचे आज रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या निधनाने अवघा देश हळहळला असून हिंदुस्थानचं उद्योग विश्वातलं रत्न हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. रात्री 11.56 वाजता टाटा ग्रुपचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक्स पोस्ट करत याबाबत अधिकृत माहिती दिली.
दरम्यान, टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्याबाबत सोमवारीही बातम्या आल्या होत्या. त्याचे खुद्द टाटा यांनीच ‘एक्स’ माध्यमातून खंडन केले होते. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. माझी प्रकृती ठीक आहे. काळजी करण्याचे कारण नाही, असे टाटांनी नमूद केले होते.
रतन टाटा हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होत. 1990 ते 2012 पर्यंत टाटा समूहाचे अध्यक्ष आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 पर्यंत हंगामी अध्यक्ष होते. टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुखपदाची धुरा त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळली.