दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानाला सील ठोकले, मुख्यमंत्री आतिषी यांचे सामान बाहेर फेकल्याचा आपचा आरोप

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान रिकामे केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याला टाळे ठोकले आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे करण्यात आले आहे. भाजप हे राज्यपालांच्या सांगण्यावरून PWD विभागाने मुख्यमंत्री आतिषी यांचे सामान घराबाहेर फेकल्याचा आरोप आपने केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

उपराज्यपालांकडून भाजपच्या एका मोठ्या नेत्याला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान देण्याची तयारी सुरू आहे. राजधानी दिल्लीत भाजप 20 वर्ष सत्तेत होती. मात्र आप सत्तेत आल्यापासून त्यांना पुन्हा सत्ता मिळवता आलेली नाही. त्यामुळे आता भाजपला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ताब्यात घ्यायचे आहे. राज्यपालांकडून भाजपच्या एका मोठ्या नेत्याला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान देण्याची तयारी सुरू आहे, असा आरोप आप ने केला आहे.

आपचे खासदार संजय सिंह यांनी मुख्यमंत्री निवासावरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ताब्यात घ्यायचे आहे असा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना खोटी आश्वासने देत आहे. असे अनेक डावपेच त्यांनी दिल्लीतही खेळले आहेत. आमच्या पक्षाला तोडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 27 वर्षांपासून भाजप दिल्लीत निवडणुका लढत आहे. मात्र निवडणुका हरल्यावर त्यांनी आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांना संपवण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर आमचे कार्यकर्ते आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यातही ते अपयशी ठरले त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान काबीज करायचे आहे. असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला.