हिरोईन दिसत नाहीस म्हणून अनेकांनी हिणवलं, आता ठरली देशातील सर्वोत्तम अभिनेत्री

नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 70 व्या राष्ट्रीय पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदुस्थानी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रपतींनी नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. या दोन्ही अभिनेत्रींसाठी हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार होता.

तमिळ चित्रपट थिरुचित्रंबलममधील शोभनाच्या भूमिकेसाठी नित्या मेनन यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर मानसी पारेख यांना गुजराती चित्रपट कच्छ एक्सप्रेसमधील मोंगीच्या भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला. मानसी या चित्रपटाची सहनिर्माती देखील आहे. दोन्ही अभिनेत्रींना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार स्वीकारताना मानसी भावूक झाली. कारण हा पुरस्कार तिच्यासाठी आणि तिच्या नवऱ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील अभिनेत्री मानसी पारेखचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मानसी पुरस्कार स्विकारताना भावूक झालेली दिसली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी तिचे कौतुक केले.

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर एका मुलाखतीत तिने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी इथवर पोहोचण्यासाठी केलेला संघर्ष, त्यातील कठीण प्रसंग,आणि माझी स्वप्न घेऊन मी इथपर्यंत आले आहे. पुरस्कार घेत असताना त्या एका क्षणात मला माझ्या आयुष्यातील सर्व चांगले-वाईट क्षण आठवले. मला अनेकांनी हिणवलं. मी करू शकत नाही, तुझ्यात तेवढी क्षमता नाही असं अनेक जण म्हणाले. मी एका एका प्रोजेक्टसाठी अनेक दिवस वाट पाहिली होती. पण मी धीर सोडला नाही. मी नेहमी विचार केला की माझ्यामध्ये ती क्षमता आहे, मी ते करू शकते आणि मी करूनही दाखवलं. यावर्षी मी अभिनय क्षेत्रात 20 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे हा दिवस मला आयुष्यभर लक्षात राहील. असे मानसी यावेळी म्हणाली आहे.