हार्दिक पंड्याची गाडी सुसाट; ICC T20 Ranking मध्ये चार स्थानांची बढत, अर्शदीपची अव्वल 10 गोलंदाजांमध्ये एंट्री

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि अर्शदिप सिंह यांनी बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात धुवाँधार कामगिरी केली होती. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही स्तरावर पंड्याने बांगलादेशला सळो की पळो करून सोडले. त्याच्या या धमाकेदार कामगिरीमुळे त्याला ICC टी20 क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे. त्याचबरोबर अर्शदीप सिंहची अव्वल दहा गोलंदाजांमध्ये एंट्री झाली आहे.

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टी20 क्रमवारीत हार्दिक पंड्याला चार स्थानांचा फायदा झाला आहे. तो आता अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवातीर 216 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. त्याचबरोबर अव्वल 10 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या एकमेवर हिंदुस्थानी खेळाडू आहे. त्याच्या नंतर 11 व्या स्थानावर अक्षर पटेलचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर इंग्लंडचा लियान लिव्हिंगस्टोन 253 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर 235 रेटिंग गुणांसह नेपाळचा दिपेंद्र सिंग आहे. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये अर्शदीप सिंहला आठ स्थानांचा फायदा झाला असून तो आता 642 रेटिंग गुणांसह 9 व्या स्थानावर पोहचला आहे.

हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल व्यतिरिक्त फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव 807 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. तर पहिल्या स्थानावर ट्रेव्हिस हेड 881 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. त्याचबरोबर यशस्वी जयस्वाल पाचव्या स्थानावर आहे. अव्वल दहा फलंदाजांमध्ये सूर्या आणि यशस्वी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही हिंदुस्थानी फलंदाजांला स्थान मिळवता आले नाही.