भाजपचा स्वबळाचा नारा, हरयाणाचा निकाल अन् मित्रपक्षांचं भविष्य; रोहित पवारांचा मिंधे-अजितदादांना सूचक इशारा

हरयाणामध्ये भारतीय जनता पक्षाने 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. तर काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आणि 2019 ला किंगमेकर ठरलेल्या जननायक जनता पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मिंधे आणि अजित पवार गटाला सूचक इशारा दिला आहे.

गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला 40 जागांवर समाधान मानावे लागले होते आणि बहुमतासाठी 6 जागा कमी पडत होत्या. त्यावेळी भाजपने जननायक जनता पक्षाशी युती करत सत्ता स्थापन केली होती. जननायक जनता पक्षाचे 2019 मध्ये 10 आमदार निवडून आले होते. मात्र यंदा या पक्षाला खातेही उघडता आले नाही.

यावरून रोहित पवार यांनी मिंधे-अजितदादांना सूचक इशारा दिला. ते म्हणाले की, दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाला यावेळी एकही जागा मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान 2029 ला स्वबळाचा नारा दिला होता. यावरून महाराष्ट्रातही भाजपचे मित्रपक्ष संपवले जातील हे सिद्ध होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी हरयाणाच्या निकालातून शिकले पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.

हरयाणातील निकालाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नाही, तिथल्या चुका इथे दुरुस्त होतील! – संजय राऊत

जेजेपीचा सुपडा साफ

2019 ला किंगमेकर ठरलेल्या जेजेपी पक्षाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. विशेष म्हणजे दुष्यंत चौटाला यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. कलान मतदारसंघातून त्यांना यंदा केवळ 7 हजार 950 मतं मिळाली असून गेल्या निवडणुकीत त्यांनी 92 हजार 504 मतं मिळवली होती.