महाराष्ट्र दिल्लीतील दोन ठगांची गुलामगिरी स्वीकारणार नाही! उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती. आता गुजरातमधील दोन ठग दिल्लीत बसून माझ्या महाराजांचा महाराष्ट्र लुटताहेत आणि हाच लुटीचा पैसा वापरून स्वतःची जाहिरात करताहेत, असा हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर चढवला. महाराष्ट्राच्या पुढच्या पिढय़ा स्वाभिमानाने जगल्या पाहिजेत, दिल्लीतील दोन ठगांच्या गुलामगिरीत त्यांना जगू देणार नाही, महाराष्ट्र त्यांची गुलामी स्वीकारणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

दादरच्या शिवाजी मंदिर सभागृहात शिवसेनेच्या वतीने राज्यव्यापी वज्रनिर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या परिषदेला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप आघाडी सरकार आणि राज्यातील मिंधे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

मिंधे सरकारच्या फसव्या योजनांचा समाचार उद्धव ठाकरे यांनी या वेळी घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, मिंधे सरकार एकामागोमाग एक योजनांचा पाऊस पाडतेय. मात्र अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. समारंभ करताहेत. पैसे देऊन लोक आणताहेत. एसटीच्या गाडय़ा देताहेत. फुकटच्या साडय़ा वाटताहेत. मग महिलांना विचारताहेत, मिळाले का पैसे तुम्हाला? अरे, काय घरून पैसे आणलात का तुमच्या, असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

याच मुद्दय़ावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गद्दारांची अक्षरशः सालटी काढली. ते संतप्तपणे म्हणाले की, जनतेच्या हक्काचे पैसे तुम्ही ढापलात. सरकार स्थापन करतानाच 50 खोके घेतलात. म्हणजे गद्दारांना 50 खोके आणि बहिणींना फक्त पंधराशे? फोडाफोडी, गद्दारी करताना लाज वाटली नाही आणि आता जनतेचेच पैसे त्यांना देऊन महाराष्ट्रधर्माशी गद्दारी करायला लावताय? असा खणखणीत सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण त्याचा गवगवा कधीच केला नाही, कारण ते सरकारचे कर्तव्यच होते. कारण तसे करणे म्हणजे महाराष्ट्रधर्म नाही, याचीही जाणीव या वेळी उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

सत्तर हजार कोटींचा  घोटाळाही आता लाजतो

कोरोना काळात महाविकास आघाडीने केलेले काम भाजप आणि मिंधे सरकार पुसून टाकायला पाहतेय, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपशासित राज्ये आहेत त्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे कोरोना काळातील काम बघा, तिथे मुख्यमंत्री म्हणून मी मागे पडलो असेन तर पुन्हा तोंड दाखवणार नाही. काढा बाहेर, हिशेब मांडा, असे आव्हानही त्यांनी दिले. भाजपशासित राज्यांमधील व्हेंटिलेटर घोटाळा, पीएम केअर फंडातील घोटाळ्याबद्दल कुणी बोलतच नाही. एवढे मोठे घोटाळे केलेत की आता 70 हजार कोटींचा घोटाळा लाजतो. म्हणतो, शी…सत्तर हजार कोटींचा घोटाळा… काय सुटय़ा पैशांचा घोटाळा, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. गावोगावी जाऊन हे घोटाळे जनतेसमोर मांडा, असे आवाहनही त्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना केले.

भाजपला राम का पावला नाही?

अयोध्या मुद्दय़ावरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, अयोध्येत भाजप का हरली? वाराणसीत का मागे पडली? अयोध्येतील लोक हिंदुत्ववादी नाहीत का? अयोध्येत राम मंदिर बांधले. घाईघाईत बांधले. गळके बांधले. निवडणूक डोळय़ासमोर ठेवून घाईघाईत उद्घाटनाचा कार्यक्रम उरकला. एवढे करूनसुद्धा तिथे भाजपचा पराभव कुणी केला? तिथला राम भाजपला का पावला नाही? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

राम मंदिरासाठी पुजारीही गुजरातमधून आणताहेत

‘अयोध्येत अदानी आणि लोढांना मोठमोठी कंत्राटे दिली गेली. त्याबद्दल अयोध्यावासीयांमध्ये संताप आहे. राम मंदिरासाठी इतके कारसेवक रक्तबंबाळ झाले, शहीद झाले. काहींना कायमचे अपंगत्व आले. हे सगळं कुणासाठी केलं?अदानीसाठी की लोढासाठी? असे अयोध्येतील लोक विचारत आहेत. मंदिरासाठी सर्व कंत्राटदार मोदी-शहांच्या गुजरातमधलेच. आता पुजारीही गुजरातमधून आणताहेत. का करताय एवढे सगळे?’ असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

नवा महाराष्ट्र नको, महाराष्ट्राचे स्वत्व टिकवा

नवा महाराष्ट्र घडवूया अशी साद यावेळी स्वयंसेवी संस्थांनी घातली. मात्र नवीन महाराष्ट्र घडवण्याची गरज नसून महाराष्ट्राचे स्वत्व टिकवले तरी महाराष्ट्र कित्येक पावलांनी इतरांपेक्षा पुढारलेला आणि सुधारलेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कोणतेही क्षेत्र घ्या. क्रांतिकारकांचे घ्या, साधुसंतांचे घ्या, समाजसुधारकांचे घ्या, कलाकारांचे घ्या, साहित्यिकांचे घ्या, जवानांचे घ्या. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र पुढे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी अभिमानाने सांगितले.

...ही क्रांतीची सुरुवात

राजकारणाच्या वळचणीला न जाणारी लोकं शिवसेनेला सोबत घ्यायला आली ही नक्कीच क्रांतीची सुरुवात आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना म्हणाले. जनतेला भ्रमातून बाहेर काढणे हे सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांचे काम आहे. मत बनवणे आणि मत मागणे यात फरक आहे. तुम्ही मते बनवणारी लोकं आहात आणि त्यामुळे तुमचे महत्त्व अधिक आहे, असे प्रशंसोद्गारही त्यांनी काढले.

महाराष्ट्रधर्म राखण्यासाठी सोबत येईल तो शिवसेनेचा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भाषणाची सुरुवात करताना माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असे म्हणायचे. हिंदू धर्मावर घाला आला तेव्हा त्यांनी तमाम हिंदू बांधवांनो… असे म्हणायला सुरुवात केली. बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून देशाचे संविधान भाजपवाले बदलू पाहताहेत म्हणून मी तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असे लोकसभेच्या प्रचारावेळी म्हणालो तर माझे काय चुकले, असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. देशावर घाला घातला जात होता. त्यामुळे आपण देशभक्त हा शब्द वापरला, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र धर्म राखण्यासाठी जो शिवसेनेसोबत येत आहे तो कोणत्याही जातीधर्माचा असो तो आमचा आहे, असेही ते म्हणाले.

देशातील लोकशाही भाजपला का संपवायचीय. लोकशाही नसती तर भाजप निवडून आली असती का? आता निवडून आल्यानंतर ते लोकशाही खतम करण्याची भाषा करताहेत आणि तशी पावलेही टाकताहेत. ती पावले जनतेने ओळखली पाहिजेत

 महाराष्ट्र वाचवायला उतरलोयमांजरासारखे आड याल तर पेकाटात लाथ घालू

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत वाद होऊ नयेत अशी अपेक्षा यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी व्यक्त केली होती. तो धागा पकडून उद्धव ठाकरे उल्का महाजन यांना उद्देशून म्हणाले की, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कुणीही मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर करावे, शिवसेना आत्ता तुमच्या साक्षीने पाठिंबा देईल. मुळात शिवसेनेला महाराष्ट्र प्यारा आहे. महाराष्ट्राचे हित साधायचेय. माझ्या डोक्यात काही वेडीवाकडी स्वप्ने पडत नाहीत. मी पुन्हा येईन…पुन्हा येईन. असे पुन्हा यायचे नव्हते तर पुन्हा कशाला येईन? पण महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे गरजेचे आहे ते केल्याशिवाय राहायचे नाही हा शिवसेनेचा निर्धार आहे. त्याच्या आड जर कुणी काळय़ा मांजरासारखे येत असेल तर पेकाटात लाथ घातल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

शिवसेना जातपात पाहत नाही, भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे

शिवसेना कुणाचीही शत्रू नाही असे स्पष्ट करत उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपुत्रांसाठीच शिवसेनेची स्थापना केली. प्रत्येक राज्यात तेथील भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही न्याय्य हक्क मागत आहोत. शिवसेना कधीही मुसलमानांविरोधात नव्हती. शिवसेनाप्रमुखांच्या भाषणातले एक तरी वाक्य दाखवा ज्यात त्यांनी सर्व मुस्लिम शत्रू असल्याचे म्हटले आहे. एकही नाही. शिवसेनेचा लढा महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आणि देशप्रेमी असा आहे. देशासाठी जीव द्यायला तयार आहेत तो जात-पात-धर्माने कुणीही असला तरी तो आमचा आहे आणि हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

जनतेचा आग्रहनामा मंजूरमाझा आग्रह आहे की घटनाबाह्य सरकार घालवा

या वज्रनिर्धार परिषदेमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या वतीने जनतेचा आग्रहनामा मांडण्यात आला. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकांचा आग्रहनामा मला मान्य आहे. पण केवळ आग्रहनामा मांडून चालणार नाही. मला मते हवी आहेत म्हणून आग्रहनामा जसाच्या तसा मंजूर. पण जनतेकडेही माझा आग्रह आहे की जे घटनाबाह्य सरकार आहे ते तुम्ही घालवा. हा माझा आग्रह तुम्ही मान्य केलात तर मी तुमचा आग्रह मान्य करण्याच्या परिस्थितीत येऊ शकेन. एकतर्फी आग्रह होऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपला खांदा द्यायची वेळ आलीय

देशात भारतीय जनता पक्षाला कुणीही ओळखत नव्हते. पण शिवसेनेचंच पाप, की त्यांना खांद्यावर बसवून केंद्रातील सत्तेपर्यंत नेले. खांदा म्हटला की त्याचे दोन अर्थ निघतात. मात्र आता भाजपला राजकारणात पुन्हा खांदाद्यायची शिवसेनेची इच्छा आहे, जनता वाटच पाहतेय, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. लोकसभेत देशात शिवरायांच्या महाराष्ट्रानेच भाजपची मुजोरी उतरवली. आता विधानसभेतही महाराष्ट्र वाचवायला उभे राहूया, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जाहिरातींतून फेक नरेटिव्ह पसरवताहेत

भाजपचे दोन ठग महाराष्ट्र लुटताहेत आणि तोच लुटीचा पैसा वापरून मिंधे आणि भाजप स्वतःची जाहिरात करताहेत. यांचे जाहिरातींचे बजेट किती मोठे असेल बघा. मोठमोठे तारे- तारका घेताहेत आणि जनतेच्या डोळ्यासमोर काजवे चमकवताहेत. त्या जाहिरातींच्या माध्यमातून सरकार फेक नरेटिव्ह पसरवतेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुलगी शिकली प्रगती झाली, पण पंधराशे देऊन घरी बसवली. मग उपयोग काय शिक्षणाचा? किती काळ लाडकी बहीण पंधराशे रुपये घेऊन तिच्या बेकार भावाला सांभाळणार आहे? किती काळ आई तिच्या बेरोजगार मुलाला पंधराशे रुपयात सांभाळणार आहे? बेरोजगारांच्या हाताला काम नको का?

मराठीगुजराती वाद दोन ठगांमुळेच

तुषार गांधी यांनी यावेळी मोदी-शहा या दोन ठगांमुळे गुजराती-मराठी वाद होऊ नये असे मत मांडले. तो धागा पकडत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘तुम्ही वर्मावर बोट ठेवले. गुजराती-मराठी वाद कधीच नव्हता आणि तो होऊ नये अशी शिवसेनेची इच्छा आहे. पण दिल्लीत बसलेल्या दोन गुजराती ठगांनी मुंबईच नव्हे, तर गुजरात आणि देश यामध्ये एक भिंत बांधली आहे.’

पूर्वी बुलेटने क्रांती केली ती आता बॅलेटने होऊ शकते. शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र धोक्यात आहे. शिवसेना महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात उतरलीच आहे. जनतेनेही सोबत राहावे. – उद्धव ठाकरे