महमुदुल्लाहचा टी-20 क्रिकेटला अलविदा

शाकिब अल हसनच्या निवृत्तीनंतर काही दिवसांतच अनुभवी महमुदुल्लाह यानेही टी-20 क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याने बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसलाय. हिंदुस्थान दौऱ्यावरील 12 ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होणारा तिसरा टी-20 सामना त्याचा अखेरचा सामना असेल.

हिंदुस्थान दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशचा दुसरा टी-20 सामना राजधानी नवी दिल्लीत उद्या (दि. 9) यजमान संघाविरुद्ध होणार आहे. या लढतीच्या पूर्वसंध्येलाच 38 वर्षीय महमुदुल्लाहने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. दोन दिग्गजांनी एकाच वेळी निवृत्ती घेतल्याने बांगलादेश संघात मोठी खळबळ उडाली आहे.  महमुदुल्लाहने 2007 मध्ये केनियाविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो गेल्या 17 वर्षांपासून बांगलादेशकडून क्रिकेट खेळत होतो. शाकीब अल हसन आणि झिम्बाब्वेच्या शॉन विल्यम्सनंतर सर्वात मोठी टी-20 कारकीर्द गाजविणारा महमुदुल्लाह तिसरा क्रिकेटपटू होय.

‘हिंदुस्थान दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटला अलविदा करायचे हे मी आधीच ठरविले होते. कर्णधार आणि प्रशिक्षक यांना मी याबाबत अवगतही केले होते. या दोघांशी चर्चा झाल्यानंतर मी निवृत्तीचा निर्णय बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांना कळविला होता. टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याची हीच योग्य वेळ होय. आता मी केवळ एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणार आहे. – महमुदुल्लाह