Mumbai News – वन्यजीव तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त, कफ परेड पोलिसांकडून चौघांना अटक

मांडूळ सापाची विक्रीचे रॅकेट उद्धवस्त करत कफ परेड पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. दक्षिण मुंबईतील मेकर टॉवरजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून मांडूळ साप हस्तगत केला आहे. औषधे बनवण्यासाठी आणि काळ्या जादूसाठी या सापाची तस्करी केली जाते.

मारुती इर्टिगा कारमधून काही लोक मांडूळ सापाची विक्री करण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती कफ परेड पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ निरीक्षक संदीप विश्वासराव यांनी निरीक्षक देवकर आणि उपनिरीक्षक भागवत यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात केले. पोलिसांनी सापळा रचत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

ठरलेल्या वेळी चार संशयित मारुती कारने आले. त्यांच्या संशयास्पद वागणुकीमुळे पोलिसांनी कारची झडती घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना कारच्या मागील बाजूस एक जिवंत मांडूळ साप असलेली मोठी बॅग आढळली. यानंतर सुमारे 5 किलोग्रॅम वजनाचा आणि 55 इंच लांबीचा हा साप पोलिसांनी जप्त केला.