पन्ना व्याघ्र प्रकल्पातून आनंदाची बातमी, वाघिणीने दिला चार शावकांना जन्म

मध्यप्रदेशमध्ये जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. मान्सूननंतर पर्यटकांसाठी खुल्या झालेल्या पन्ना व्याघ्र प्रकल्पातून आनंदाची बातमी आहे. वाघिण पी-141 ने चार शावकांना जन्म दिला आहे. सोमवारी वाघिणी आणि तिच्या चार शावक पहिल्यांदाच फिरताना दिसले. हा सुंदर क्षण लखनऊचे वन्यजीव छायाचित्रकार रामप्रकाश वर्मा यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक अंजना शुचिता तिर्की यांनी सांगितले की, वाघिण पी 141 ने चौथ्या कुंडीत चार शावकांना जन्म दिला आहे. चारही शावक निरोगी आहेत. शावकांमध्ये किती नर आणि मादी आहेत त्याची अद्याप ओळख पटलेली नाही.

मध्यप्रदेशच्या पन्ना नॅशनल पार्कमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्य़ेने पर्यंटक येतात. यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्याही जास्त असते. जवळपास 70 वाघांनी सजलेल्या या व्याघ्र प्रकल्पात चिंकर, चौसिंगा हरीण, सांबर, मगरी, रानमांजरही पाहायला मिळणार आहे. शिवाय 200 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती देखील आहेत. कुटुंब किंवा मित्रांसह भेट देण्यासाठी हे सर्वोत्तम पर्यटन स्थळ आहे.