फोन खणखणताच शिव आरोग्य सेना दोन कुटुंबीयांच्या मदतीला धावली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिव आरोग्य सेनेने दोन जीवांचे प्राण वाचवले आहेत. मदतीसाठी फोन खणखणताच क्षणाचाही विलंब न करता शिवसैनिकांनी ठाण्यातील दोन रुग्णालयांत धाव घेत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. ब्रेन डेड झालेल्या मातेच्या पोटातून एका जिवंत बाळाचा जन्म झाला. तर दुसऱ्या घटनेत पोटातच बाळ दगावल्याने जीवन-मरणाचा संघर्ष करणाऱ्या अन्य एका गर्भवतीची सुखरूपपणे प्रसूती केली आहे. दोन्ही रुग्णालयांच्या डॉक्टरांबरोबर समन्वय साधतानाच अवाचेसवा आकारलेल्या बिलातूनदेखील सुटका करून दिली. त्यामुळे या कुटुंबीयांनी शिव आरोग्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर व महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ, ठाणे जिल्हासंपर्क समन्वयक डॉ. प्रशांत भुईंबर तसेच शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या सूचनेनंतर ठाण्यातील शिव आरोग्य सेनेच्या पथकाने मुंब्य्राच्या एका खासगी रुग्णालयात धाव घेतली. मुंब्य्राच्या एका खासगी रुग्णालयात गर्भवती महिलेच्या पोटातच बाळ दगावल्याने डॉक्टरांनी सीझर करून बाळाला काढले. मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे दीड लाख बिल भरणे शक्य नव्हते. ओवळा- माजिवाडा विधानसभेचे समन्वयक सचिव अजिम शेख, फुल बानो पटेल, मनीषा पाटील, लता देहरकर यांनी रुग्णालय प्रशासनाबरोबर पाठपुरावा करून बिलामध्ये 87 हजार सवलत मिळवून दिली.