सरकारी कर्मचारी वसाहतीतील कर्मचाऱ्यांचा महायुती सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम, आदित्य ठाकरेंनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट

वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना शासकीय वसाहतीमध्ये अल्प दरात हक्काचे घर देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस होता. उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची प्रकृती खालावली आहे. आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला.

वांद्रे शासकीय वसाहतीच्या पुनर्विकास योजनेत माफक दरात मालकी हक्काची घरे देण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी दोन ऑक्टोबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी ‘गव्हर्नमेंट क्वार्टर्स रेसिडेन्स असोसिएशन’च्या माध्यमातून घरांसाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना घरे देण्याचे आश्वासन दिले आहे, पण काही सनदी अधिकारी त्यामध्ये खोडा घालतात असा संघटनेचा आरोप आहे.

मोदींच्या दौऱ्यामुळे बैठक रद्द

उपोषण सुरू केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सह्याद्रीवर बैठक आयोजित केली, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे ही बैठक रद्द झाली. त्यानंतर पालक मंत्री मंगलप्रभात लोढा व दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांची भेट घेऊन सकारात्मक निर्णयाचे आश्वासन दिले आहे, पण दोन दिवसांत लेखी आश्वासन न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा असोसिएशनने दिला आहे.

भूखंडाची खैरात

आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांना घरांसाठी वांद्रे येथे 9 भूखंड दिले आहेत. चर्चगेटपासून अंधेरीपर्यंत अधिकाऱ्यांना तेरा ते चौदा भूखंड दिलेले आहेत, पण कर्मचाऱ्यांना भूखंड देताना सनदी अधिकारी नियम दाखवतात असा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी केला.

बिनकामाचे मुख्यमंत्री ः आदित्य ठाकरे

शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांची आज भेट घेतली आणि पाठिंबा व्यक्त केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, संपूर्ण मुंबई अदानीच्या घशात घातली जात आहे. मढमध्ये जागा दिली जाते. काही ठिकाणी वीस प्लॉट दिले जात आहेत. हे सर्व होत असताना दुसरीकडे सरकारी सेवेत कार्यरत असलेले कर्मचारी आणि वसाहतीमधील मराठी माणसे आहेत. घरे त्यांना मिळायला हवीत. महाराष्ट्रात आपण अनेक उपोषणे पाहिली आहेत, पण कुठेही न्याय मिळालेला नाही. राज्यात बिनकामाचे मुख्यमंत्री आहेत. सरकार निर्दयी आहे. यांना फक्त स्वतःच्या कामांची पडली आहे, पण महाराष्ट्राची बिलकूल पडलेली नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. यावेळी शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, विधानसभा संघटक सदा परब, हाजी अलिम शेख, शेखर वायंगणकर उपस्थित होते.