पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर पी. व्ही. सिंधू व लक्ष्य सेन फिनलॅण्डमधील आर्कटिक ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे तमाम देशवासियांच्या नजरा हिंदुस्थानच्या या स्टार खेळाडूंच्या कामगिरीकडे असतील.
पी. व्ही. सिंधू या स्पर्धेत कॅनडाच्या मिशेल ली हिच्याविरूद्धच्या लढतीने आपल्या अभियानास सुरूवात करणार असून, लक्ष्य सेनची सलामी डेन्मार्कच्या रासमस गेम्के याच्याशी झडणार आहे. सिंधूने विजयी सलामी दिल्यास दुसर्या फेरीत तिच्यापुढे जपानच्या १८ वर्षीय टोमाको मियाजाकी हिचे आव्हान असेल. या वर्षाच्या प्रारंभी स्विस ओपनमध्ये याच टोमाकोने सिंधूला हरविले होते. पुरूष एकेरीत सेनला पहिल्याच लढतीत रासमस गेमकेला हरवून उट्टे काढण्याची संधी असेल. कारण गतवर्षी इंडिया ओपनमध्ये सेन रासमसकडूनच पराभूत झाला होता. याचबरोबर दुखापतीमुळे चार महिने कोर्टपासून दूर राहिलेला किदाम्बी श्रीकांतही आर्कटिक ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. मात्र, तो किरण जॉर्ज व सतीश कुमार या आपल्या देशसहकार्यांसह पात्रता फेरीतून अभियानास प्रारंभ करेल.