युद्धानंतर 365 दिवसांत गाझाने खूप काही गमावले, 41 हजार लोकांचा मृत्यू; 90 टक्के शाळा उद्धवस्त

7 ऑक्टोबर 2023 याच दिवशी हमासने अचानक इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केला. या हल्ल्याचा कोणताही अंदाज आला नाही, त्यामुळे एका झटक्यात 1200 लोकांचा मृत्यू झाला. हमास संघटना 257 लोकांना कैदी बनवून आपल्यासोबत घेऊन गेली. या हल्ल्याची परतफेड इतकी वाईट असू शकेल, याचा विचार हमासने केला नाही.

इस्रायलने वर्षभर गाझावर हल्ले केल्याने हमासच्या हल्ल्याची शिक्षा आता गाझा भोगत आहे. 1200 इस्रायली नागरिकांच्या बदल्यात इस्रायलने आतापर्यंत गाझामधील 41 हजारांहून अधिक लोकांना मारले आहे. 365 दिवसांत गाझा पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

गाझाला या युद्धाचा जबर फटका बसला आहे. 81 टक्क्यांपर्यंत जीडीपीमध्ये घसरण झाली आहे. गरिबी वाढली आहे. बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली असून लोक जेवणासाठी भटकत आहेत. गाझा पट्टीत 230 किलोमीटरपर्यंत शेतजमीन आहे. यातील 140 किमीपर्यंतची जमीन नापीक झाली आहे.

गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्याने केवळ मुलांनाच लक्ष्य करण्यात आले नाही, तर नोकरी करणाऱ्यांनाही टार्गेट करण्यात आले. वर्षभर चाललेल्या या युद्धामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. आकडेवारीनुसार, गाझातील बेरोजगारीचा दर 79.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. या ठिकाणी ज्या मोठ्या कंपन्या काम करत होत्या, त्या आता पूर्णपणे बंद झाल्या आहेत. मोठ्या कंपन्यांचे प्रोडक्शन व्हॅल्यू 85.8 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. दोन लाखांहून अधिक नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

90 टक्के शाळा उद्ध्वस्त

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील 90 टक्के शाळा बरबाद झाल्या आहेत. युनिसेफच्या आकडेवारीनुसार, या वर्षी 45 हजारांहून अधिक मुलांना शाळेत प्रवेश घेता आला नाही. तसेच युद्धामुळे आतापर्यंत 6 लाख 25 हजार मुलांना शाळेत प्रवेश मिळणे बंद झाले आहे. इस्रायलकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे 123 शाळा उद्ध्वस्त झाल्यात आहेत. 11,500 मुलांचा मृत्यू झाला आहे. 750 शिक्षक ठार झाले आहेत. 39 हजार विद्यार्थी आपल्या पदवीची परीक्षा देऊ शकले नाहीत.