मिंधे गटाचे शहरप्रमुख विजय माने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक सतीश रामाणे यांना फेसबुक लाईव्हमध्ये ठार मारण्याची धमकी दिली. माने यांच्या खोडसाळपणामुळे नेरुळ येथील नवरात्रोत्सवात खंड पडला आहे. मिंधे गटाने नियम पायदळी तुडवून अनधिकृतरीत्या वादग्रस्त जागेवर उभारलेल्या कमानी पोलिसांनी काढल्यानंतर माने यांनी फेसबुक लाईव्ह करून धिंगाणा घातला.
नेरुळ येथे गेल्या 14 वर्षांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदाही मंडळाने आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेतल्या होत्या. मात्र मिंधे गटाचे शहरप्रमुख विजय माने यांनी या उत्सवात खोडा घातला. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांना समज देऊन वादग्रस्त जागा सोडून दोन ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यास सांगितले. दरम्यान हा खोडसळपणा मिंधे गटाचे विजय नाहटा यांच्या इशाऱ्यावरून होत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला आहे.
पोलिसांनी कमानी काढल्या
शिवसेना व मिंधे गटाने गरबा ठेवू नये अशी विनंती पोलिसांनी केली. मात्र माने यांनी गरब्यासाठी कमानी उभ्या केल्या. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, संतोष घोसाळकर, काशिनाथ पवार, महानगरप्रमुख सोमनाथ वास्कर यांनी तक्रार केल्यानंतर नेरुळ पोलिसांनी माने यांनी उभारलेल्या कमानी काढून टाकल्या.