विनाअनुदानित शिक्षकांना तारीख पे तारीख; सरकारकडून पुन्हा घोर निराशा; कॅबिनेटमध्ये साधा विचारही नाही

अंशतः अनुदानित शिक्षकांचा टप्पावाढीचा निर्णय होईल, या आशेवर गेले 65 दिवस शिक्षक उपसंचालक कार्यालय कोल्हापूर आणि मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या शिक्षकांच्या पदरी पुन्हा घोर निराशाच पडली. गेल्या पंधरा दिवसांतील आजच्या तिसऱ्या कॅबिनेटमध्येही राज्य सरकारने अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचा वाढीव टप्प्याचा साधा विचारही केला नाही.

राज्यातील सर्व जिह्यांमधील हजारो शिक्षक वाढीव टप्प्याचा जीआर व विविध मागण्यांसाठी गेले 65 दिवस आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडून जीआर काढण्यात येईल, असे वारंवार सांगण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांत दोन आणि आज एक अशा तीन कॅबिनेट बैठका झाल्या. यात सरकारने वाढीव टप्प्याबाबत कोणताच विषय घेतला नाही. परवा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर दौऱयात येणाऱया कॅबिनेटमध्ये वाढीव टप्प्याचा जीआर काढणारच, असे आश्वासन दिले होते. तरीही काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा विषयच आला नाही. सरकारकडून प्रत्येकवेळी आश्वासनांचे गाजरच दाखवले जात असल्याच्या भावना आता शिक्षक व्यक्त करत आहेत. काल शिक्षणमंत्र्यांनी आझाद मैदानावर जाऊन सर्व शिक्षकांना सांगितले होते की, आजच्या बैठकीमध्ये जर विषय घेतला नाही तर मी या शिक्षकांसाठी स्वतः आंदोलनाला बसेन. परंतु तसे काहीही झाले नाही. ‘तू कर मारल्यासारखे मी करतो रडल्यासारखे’, असा सरकारचा डाव नसेल ना? असा सवालही शिक्षक करत आहेत.

सभागृहात 12 जुलैला घोषणा होऊनही गेले तीन महिने शिक्षकांच्या वाढीव टप्प्याचा शासननिर्णय घेत नाही. त्यामुळे आंदोलनास बसलेल्या हजारो शिक्षकांना सरकारकडून तारीख पे तारीख दिली जात असल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. यावेळी खंडेराव जगदाळे, शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, अनिल ल्हायकर, वैजनाथ चाटे, राजू भोरे, अरविंद पाटील, तुकाराम चव्हाण, शीतल जाधव, सचिन खोंद्रे, भानुदास गाडे, सावंता माळी, महेश सातपुते, भाग्यश्री राणे, रेखा संकपाळ, गौतमी पाटील, नेहा भुसारी, वैशाली पाटील आदी उपस्थित होते.