आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व मोडीत काढण्याचे ध्येय उराशी बाळगून यूएई गाठणाऱ्या हिंदुस्थानी संघासाठी अ गटातून उपांत्य फेरीचा मार्ग अत्यंत खडतर झाला आहे. पाकिस्तानविरुद्ध विजय नोंदवत हिंदुस्थानने आपले आव्हान जिवंत ठेवले असले तरी सलामीलाच न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा धक्का बसल्याने गुणतालिकेत अव्वल दोन संघांत स्थान मिळवण्यासाठी उर्वरित दोन्ही लढती मोठ्या फरकाने जिंकाव्या लागणार आहेत. म्हणजेच दहा संघाच्या या महिला वर्ल्ड कपमध्ये स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसापासूनच नेट रनरेटची मारामारी सुरू झाली आहे.
हिंदुस्थानने पाकिस्तानला हरवले असले तरी तो गुणतालिकेत चक्क चौथ्या क्रमांकावर आहे. आता हिंदुस्थानच्या दोन लढती शिल्लक असून तिसरी लढत 9 तारखेला श्रीलंकेविरुद्ध तर चौथी 13 तारखेला जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली जाणार आहे.
सलग दोन पराभवांमुळे श्रीलंका स्पर्धेतून बाहेर फेकली गेली आहे. त्यामुळे अव्वल दोन संघांसाठी चार संघांमध्ये लढत रंगणार असून हिंदुस्थानला अव्वल दोन संघांत स्थान मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांना एक धक्का बसणे गरजेचे आहे. हा धक्का न बसल्यास हिंदुस्थानला उपांत्य फेरीत स्थान मिळवणे अवघड होऊन जाईल. अ गटाप्रमाणे ब गटातही उपांत्य फेरीसाठी नेट रनरेटची जीवघेणी धावपळ सर्व संघांना करावी लागणार आहे.