पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कोणताही बदल करण्यात आलेला नाही, परंतु हिंदुस्थान आणि चीन या दोन देशांमध्ये तणाव कायम आहे. चीन सातत्याने आपल्या सीमेवर वेगाने बदल करत आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानला आयरन डोमसारख्या हवाई संरक्षण प्रणालीची मदत मिळणार आहे. रशिया हिंदुस्थानला एस 400 एअर डिफेन्स सिस्टम देणार असून त्यामुळे पूर्व लडाखवर सहज नजर ठेवता येणार आहे. त्याचबरोबर शत्रुराष्ट्राने डागलेली क्षेपणास्त्रs हवेतच नष्ट करता येणार आहेत, अशी माहिती हिंदुस्थानच्या हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी दिली आहे.ते हवाई दल स्थापना दिनानिमित्त आयोजित समारंभात बोलत होते.
पूर्व लडाखमध्ये अधिक अद्ययावत लँडिंग ग्राऊंड आणि नवे हवाई तळ बनवण्यात येत आहेत, असे ते म्हणाले. हिंदुस्थानवर जर हल्ला झालाच तर हिंदुस्थान सर्व क्षेपणास्त्रs हवेतच नष्ट करू शकेल, असे ते म्हणाले.
2047 पर्यंत हिंदुस्थानात बनवणार शस्त्रास्त्र
हिंदुस्थान संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने काम करत आहे. 2047 पर्यंत हिंदुस्थानात शस्त्रास्त्र तयार करण्यात येतील, असे अमर प्रीत सिंह यांनी सांगितले. भविष्यात हिंदुस्थानात विमान आणि शस्त्रास्त्र प्रणाली विकसित करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टमसारख्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले.