हिंदुस्थानी हवाई दलाच्या 92 व्या दिनानिमित्त रविवारी चेन्नई येथील मरीना बीचवर एअर शो चे आयोजन करण्यात आले होते. हा एअर शो पाहण्यासाठी चेन्नईकरांनी हजारोच्या संख्येने हजेरी लावली होती. मात्र एअर शो दरम्यान प्रचंड गर्दीमुळे गुदमरल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 230 नागरिक बेशुद्ध झाले. यापैकी 93 जणांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एअर शो पाहण्यासाठी मरीना बीचवर चेन्नईतील नागरिकांनी कुटुंबासह हजेरी लावली होती. यावेळी प्रचंड गर्दी आणि कडक उन्हामुळे नागरिकांना अस्वस्थ वाटू लागले. यात तीन जणांचा मृत्यू झाला.
एअर शो पाहण्यासाठी शहरातील विविध भागातून नागरीक मरीना बीचवर आले होते. दुपारी 1 वाजता एअर शो संपल्यानंतर मरीना बीच परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सुमारे तीन तासांनी मरीना बीचजवळील वाहतूक पूर्ववत करण्यात आली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.