दिल्ली डायरी  – सिद्धरामय्यांचे काय होईल?

>> नीलेश कुलकर्णी

कर्नाटकातील म्हैसूरमध्ये उघडकीस आलेल्या भूखंड घोटाळ्यामुळे तिकडचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आसन हेलकावे खाऊ लागले आहे. सध्या भाजपने पवित्रकरून घेतलेले अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघडकीस आला होता. तसेच हे प्रकरण आहे. आदर्श घोटाळ्याची किंमत चव्हाणांना मुख्यमंत्रीपद गमावून मोजावी लागली होती. आता सिद्धरामय्या यांचे काय होईल? असा प्रश्न केला जात आहे.

म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणातून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या पत्नी पार्बती यांना देण्यात आलेले 14 भूखंड त्यांनी परत केल्याने सिद्धरामय्यांच्या भोवतीचे संशयाचे धुके अधिकच गडद झाले आहे. पार्बती यांनी आपले प्लॉट परत केल्यानंतर त्यांचे बंधू तसेच मुख्यमंत्री स्वतः आपला प्लॉट परत करणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी ईडीची एंट्री होताच, या घडामोडी ताबडतोबीने घडल्या आहेत हे विशेष! कर्नाटकातील भाजपची भ्रष्ट राजवट उलथवून सिद्धरामय्या यांनी शिवकुमार यांच्या साथीने सत्तांतर घडवून आणले. मुख्यमंत्रीपदाची सिद्धरामय्यांची पहिली टर्म ही त्यांच्या सुशासनासाठी गाजली. ‘इंदिरा कॅण्टीन’सारखी चांगली योजना त्यांनी राबवली. मात्र आता दुसऱ्या टर्मला त्यांच्यासमोर म्हैसूरच्या ‘आदर्श’ प्रकरणाने अडचणी निर्माण केल्या आहेत.

सिद्धरामय्या यांनी अद्याप तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला नसला तरी राजीनाम्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढतो आहे. गमतीचा भाग म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले शिवकुमार हेच सिद्धरामय्यांचे मुख्यमंत्रीपद जाऊ नये यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहेत. वास्तविक, सिद्धरामय्या बाजूला झाले तर शिवकुमार हे मुख्यमंत्री होतील, अशी अटकळ होती व आहे. मात्र भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सिद्धरामय्यांना हटवले तर शिवकुमार यांची प्रकरणे अगोदरच न्यायालयात आहेत. त्यांच्याही चौकशा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला मुख्यमंत्रीपद न मिळता तिसराच कोणीतरी येईल, या धास्तीने शिवकुमार राजकीय डावपेच टाकत आहेत. वास्तविक भ्रष्टाचार व नैतिकतेचे नाव घेण्याचा अधिकार कर्नाटकातील भाजप नेत्यांना नाही. त्यातच कर्नाटकातले भाजपचे काही नेते एका सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकले आहेत. असे असले तरी नैतिकतेचा टेंभा मिरवत हीच मंडळी सिद्धरामय्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिद्धरामय्यांसारख्या ओबीसी नेत्याला हटवले तर त्याचा विपरित परिणाम शेजारसह इतर राज्यांत होईल, ही काँग्रेस हायकमांडला भीती आहे. त्यातच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर शिवकुमार यांनाही मुख्यमंत्री करणे जोखमीचे आहे. अशा स्थितीत कर्नाटक काँग्रेसला सक्षम नेतृत्व देईल, असा चेहरा कर्नाटकमध्ये पक्षाकडे नाही. राष्ट्रीय अध्यक्षपद सोडून मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकात परततील याचीही सुतराम शक्यता नाही. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वही कर्नाटकातील घोटाळ्यामुळे पेचात पडले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील निवडणुका झाल्यानंतर कर्नाटकात ‘खेलो होबे’ करण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्यामुळे सध्या तरी काँग्रेस नेतृत्वासाठी कर्नाटकातला घोटाळा हा डोकेदुखी बनला आहे.

शीशमहलचा त्याग!

केजरीवाल मुख्यमंत्री असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर करोडो रुपयांची उधळपट्टी करून शीशमहल उभा केला, असा आरोप करत भाजपने टीकेची झोड उठवून एक नरेटिव्ह सेट केले होते. आम आदमीसाठी संघर्ष करणारा नेता, या केजरीवालांच्या प्रतिमेला या नरेटिव्हमुळे चांगलेच तडे गेले होते. दिल्लीची नस चांगलीच ओळखणाऱ्या चाणाक्ष केजरीवालांनी पुढचा धोका ओळखून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत शीशमहलचाही त्याग केला आणि भाजपच्या भात्यातील आरोपांचे एक शस्त्र बोथट केले. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून या शीशमहलचा मोठा प्रचार केला जाण्याची चर्चा होती. शीशमहलवर झालेल्या खर्चाचे तपशीलही मिळवले होते. एरवी केजरीवालांच्या पाठीशी ठामपणे उभारलेल्या दिल्लीकरांनाही केजरीवालांनी केलेली ही उधळपट्टी आवडलेली नव्हती. त्यामुळेच वाऱ्याची दिशा बदलते आहे हे लक्षात येताच केजरीवालांनी शीशमहलातून दोन टेम्पो सामान आणि कुटुंबीयासमवेत ‘5 फिरोजशाह रोड’ या ठिकाणी आपला मुक्काम हलवला आहे. आपचे खासदार प्रदीप मित्तल यांना वाटप झालेल्या शासकीय निवासस्थानी केजरीवाल आता राहणार आहेत. विद्यमान खासदाराच्या घरी केजरीवाल यांनी घुसखोरी केल्याची टीका आता भाजप करत आहे. मात्र, भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना अशाच पद्धतीची निवासाची खैरात ‘ल्यूटन झोन’मध्ये वाटली गेली आहे त्याचे काय?

तंवर यांचे तीर्थाटन

अशोक तंवर नावाचे हरयाणातले एक नेते सध्या प्रसिद्धीच्या जोरदार झोतात आहेत. पक्षांतराचा असा काही इरसाल नमुना या महाशयांनी पेश केला आहे की, त्यामुळे सरडादेखील लाजावा! ‘आयाराम गयाराम’ राजकारणासाठी हरयाणा तसे ख्याती प्राप्त राज्य आहे, मात्र तंवर यांनी जी पलटी मारली त्याचा काही मुकाबला नाही. झाले असे की, हरयाणातील निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अशोक तंवर यांनी ‘बीजेपी को व्होट दो’ म्हणत दुपारी 1 वाजता आपला घसा कोरडा केला. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास हे महाशय महेंद्रगढ येथील राहुल गांधींच्या सभेत आले आणि क्षणार्धात काँग्रेस‘ाr झाले. तिथे लगेचच ‘काँग्रेस को व्होट दो’ म्हणत त्यांनी आपला घसा शेकून घेतला. अजय माकन या काँगेसी नेत्याचे अशोक तंवर हे नातेवाईक. युवा दलित नेता म्हणून काँग्रेसने त्यांना खासदार, सचिवपद दिले. मात्र भूपिंदरसिंग हुड्डांशी मतभेद झाले म्हणून या महाशयांनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला. तिथेही फारसे काही करता आले नाही. म्हणून हरयाणात कोणताही बेस नसलेल्या तृणमूल काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. नंतर आम आदमी पार्टीकडेही गेले. तिकडेही मन न रमल्याने तंवरांनी पुन्हा भाजपचे कमळ हाती घेतले. आता कमळ हरयाणात कोमजेल, अशी शक्यता दिसली की म्हणून ‘काँग्रेसचा हात’ हाती घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत चार राजकीय पक्षांची ‘तीर्थाटन यात्रा’ अशोक तंवर यांनी केली आहे.

[email protected]