लाडू प्रकरणानंतर प्रसादावरून तिरुपती मंदिर पुन्हा चर्चेत, दहीभातामध्ये किडा सापडला!

लाडू प्रकरणानंतर आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती मंदिर आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मंदिरातील अन्नप्रसादात किडा सापडल्याचा दावा एका भक्ताने केला आहे. तसेच हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी अपमान केल्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही भक्ताने केला आहे. मात्र मंदिराची देखभाल करणाऱ्या ट्रस्टने अन्नप्रसादात किडा सापडल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

तिरूमला तिरुपती देवस्थानच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याचे सांगत जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी अन्य एका भक्ताने केली आहे.

चंदू नावाचा एक भक्त बुधवारी वारंगलहून तिरुपतीच्या दर्शनासाठी आला होता. चंदूने मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुंडन केले. मग तो दुपारी दीडच्या सुमारास अन्नप्रसादासाठी गेला. जेवताना चंदूला दहीभातामध्ये मेलेली गोम आढळल्याचे चंदूने सांगितले.

चंदूने सदर प्रसादाचे फोटो, व्हिडिओ काढले. यानंतर देवस्थानच्या अधिकाऱ्यांनी चंदूशी संपर्क साधून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रसाद वाढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पानातून हा किटक आला असावा, असा दावा अधिकाऱ्यांनी केला. हा निष्काळजीपणा अस्वीकार्य आहे. जर लहान मुले किंवा इतरांनी या दूषित अन्नाचे सेवन केले आणि विषबाधा झाली असती तर याला जबाबदार कोण? असा सवाल चंदूने केला आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी आपला अपमान केल्याचा आणि आपल्याला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप चंदूने केला आहे. ते आम्हाला दूर ढकलत होते. ही अत्यंत चिंतेची बाब आहे आणि सरकारने यावर कठोर कारवाई करायला हवी, अशी मागणी चंदूने केली आहे.

तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी)ने भक्ताच्या या आरोपाचे खंडन केले आहे. प्रसादात किडा सापडल्याचा आरोप निराधार आणि खोटा असल्याचे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. तसेच हा संस्थेची बदनामी करण्याचा आणि भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न असू शकतो, असा दावाही मंदिर प्रशासनाने केला आहे. अशा निराधार आणि कोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. श्री व्यंकटेश्वर आणि टीटीडीवर विश्वास कायम ठेवावा, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे.