मणिपूरचा प्रश्न सोडून इराण-इस्रायल युद्ध थांबवत आहेत, नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

पंतप्रधान मोदी मणिपूरचा प्रश्न सोडून इराण-इस्रायल युद्ध थांबवत आहेत, असे म्हणत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. रविवारी शक्ती अभियान आणि इंदिरा गांधी फेलोशिपबाबत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात महिलांच्या हिताचे काम केले जात नाही. जे काम पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी केले नाही ते राहुल गांधी करणार आहेत, असेही पटोले यांनी पुढे स्पष्ट केले.

मणिपूर देशाचा भाग नाही का?

पंतप्रधान मोदी फूट पाडण्याचे काम करतात, ही त्यांची शैली आहे. काँग्रेसला शिव्या देणे, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा अपमान करणे हे त्यांचे राजकारण आहे. राहुल गांधींच्या प्रश्नाचे उत्तर द्या. मणिपूर हा देशाचा भाग नाही का? या सगळ्या समस्या सोडून ते इराण-इस्रायल युद्ध संपवायला का जातात? असा संतप्त सवाल पटोले यांनी केला आहे.

भाजप सरकारमध्ये हिंदू असुरक्षित असल्याचे मोहन भागवत सांगत आहेत. याचा अर्थ ते ज्या पक्षाला पाठिंबा देत आहेत तोच पक्ष हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

हरियाणातील जनतेचा काँग्रेसला पाठिंबा

पत्रकार परिषदेत बोलताना पटोले यांनी हरियाणातील एक्झिट पोलवरही भाष्य केले आहे. आम्ही हरियाणात भाजपची स्थिती पाहत आहोत. हरियाणातील जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे. आता देशात परिवर्तनाची लाट दिसत आहे. तसेच मोदीजी राहुल गांधींना घाबरतात आणि देशातील जनतेला हे माहित आहे, असेही पटोले म्हणाले.

चेंबूरमध्ये रविवारी पहाटे इमारतीला आग लागून सात जणांनी आपला जीव गमावला. या घटनेचाही पटोले यांनी समाचार घेतला आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आग आणि स्फोटाच्या घटना घडत आहेत. कुठेही सर्टिफिकेशन सिस्टम नाही. प्रत्येकजण पैसे खाऊन आणि कमिशन देऊन बसले आहे आणि सामान्य लोक आपला जीव गमावत आहेत.

‘महिला आरक्षण विधेयकाला भाजपचा विरोध’

महाराष्ट्रातील जागावाटपावरही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. सगळं ठीक चाललंय, सगळं चांगलं होईल. ही नवरात्रीची वेळ आहे आणि आम्ही स्त्री शक्ती आणखी मजबूत करत आहोत. काँग्रेसने वर्षभरापूर्वी इंदिरा गांधी फेलोशिप सुरू केली होती. आजपासून महाराष्ट्रातही ही योजना सुरू होत आहे. महिला आरक्षण विधेयक सोनिया गांधींनी आणले होते. ही तेच भाजप आहे ज्यांनी या विधेयकाला त्यावेळी विरोध केला होता आणि आता ते पुन्हा मंजूर केले आहे.