कितीही थापा मारल्या तरी हरयाणापेक्षा दणदणीत पराभव महाराष्ट्रात होणार! – संजय राऊत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त असतात. कारण हरयाणा, जम्मू-कश्मीरमध्ये ते निवडणुका हरताहेत आणि त्यानंतर महाराष्ट्र, झारखंडच्या निवडणुका होताहेत. हरयाणात काँग्रेस जिंकत असून मोदींनी महाराष्ट्रात किती सभा घेतल्या, फिती कापल्या, थापा मारल्या तरी राज्याच्या जनतेने ही थापेबाजी बंद करायची ठरवली आहे. भाजपचा हरयाणापेक्षा दणदणीत पराभव महाराष्ट्रात होईल, असा ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

निवडणूक काळामध्ये मोदी देशाची राजधानी मुंबईत हलताहेत की काय अशी भीती वाटते. कारण पंतप्रधान दिल्लीत टिकतच नाहीत. देशाच्या पंतप्रधानांनी कुठे, कितीवेळा जावे या संदर्भात काही शिष्टाचार आहेत. पुण्यात एकाच मेट्रोचे त्यांनी सहा वेळा उद्घाटन केले. ते रोज खोटे बोलताहेत. अकोल्यात त्यांनी अंमली पदार्थाबाबतीच चिंता व्यक्त केली. पण हेच पंतप्रधान गौतम अदानींच्या मालकीच्या गुजरातमधील मुंद्रा बंदरावर साडे तीन लाख कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पकडले त्यावर बोलत नाहीत. हे अंमली पदार्थ अफगाणिस्तानमधून आले होते ते उतरवण्यासाठी मुंद्रा बंदराचीच निवड का केली? यावर मोदींनी बोलले पाहिजे, असे आव्हानही राऊत यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडले आणि त्याला संरक्षण देणारे नेते मिंधे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. त्याच्यावर मोदी बोलत नाहीत. काल ते पोहरा देवीच्या कार्यक्रमाला गेले आणि तिथे त्यांच्या व्यासपिठावर संजय राठोड होते. त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप आहेत. हत्या-आत्महत्येचा तपास होणे बाकी असून सदर महिलेच्या घरात अंमली पदार्थही सापडले होते. तिथे मंत्र्यांचे येणे-जाणे होते. अंमली पदार्थांची मोदींना एवढी चिंता आहे, पण त्यांच्या पायाशी हेच लोक बसले आहेत.

हे मोदींना चालते का?

हरयाणामध्ये जन्मठेप झालेल्या महात्मा राम रहिमला भाजपने आतापर्यंत 12 वेळा पॅरोलवर सोडले आहे. निवडणुकीवेळी त्याला पॅरोलवर सोडण्यासाठी मोदी विशेष प्रयत्न करताहेत आणि तो बाहेर येऊन भाजपला मतदान करा असे आवाहन करतो. त्याच्या आश्रमात महिलांवर अत्याचार, खून झाले, अंमली पदार्थ सापडले. हे मोदींना चालते का? असा बोचरा सवालही राऊत यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मोदींनी भाषण करण्यापूर्वी इतिहास समजून घेतला पाहिजे. मोदींना भाषण कोण लिहून देते? मोदींना जी संस्था किंवा व्यक्ती भाषण लिहून देतात ते त्यांचीच बेआब्रू करत आहेत. असे भाषण करून देशाचे पंतप्रधानांची हास्यजत्रा करताहेत.

गोड बातमी घेऊन आलात कारण…

मोदी ठाण्यात म्हणाले की मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो आहे. गोड बातमी काय करत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले. तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण महाराष्ट्रात निवडणुका हरताहेत. लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला. महाराष्ट्र विधानसभेतही हरताय, त्यामुळे राज्याराज्यात अशा गोड बातम्या देत फिरताहेत. जर तुम्हाला मराठी भाषे संदर्भात हा निर्णय घ्यायचा होता, तर आधीही घेता आला असता, असेही राऊत म्हणाले.